नाशिक : इगतपुरी तालुक्यातील जिंदाल पॉली फिल्म्सची उपकंपनी असलेल्या जेपीएफएल फिल्म्स या उपकंपनीच्या विस्तारासाठी तब्बल ७०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. नवीन बीओपीपी, पीईटी आणि सीपीपी लाइन्स उभारण्यासाठी ही गुंतवणूक केली जाणार असून, यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.
जिंदाल पॉली फिल्म्स ही कंपनी बीओपीपी आणि बीओपीई फिल्म्स निर्मितीत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. ज्याचा वापर प्रामुख्याने पॅकेजिंग, लेबलिंगसाठी केला जातो. कंपनी इगतपूरी येथील प्रकल्पाचा विस्तार करणार असून, त्यासाठी सातशे कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणूकीतून नवीन बीओपीपी, पीईटी आणि सीपीपी लाइन्स उभारल्या जाणार असून, पुढील दोन ते तीन वर्षात नवीन लाईन्स कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या गुंतवणूकीतून प्रतिवर्षी ४२ हजार टन बीओपीपी, ५५ हजार टन पीईटी तर १८ जार टन सीपीपी एवढ्या क्षमतेच्या लाइन्स उभारण्यात येणार आहेत. अन्न आणि पेये, औषध उद्योगांमध्ये लवचिक पॅकेजिंगचा वापर वाढल्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा करण्याच्या हेतूने कंपनीने विस्ताराची भूमिका घेत गुंतवणूक जाहीर केली आहे. दरम्यान, या गुंतवणूकीतून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून, गुंतवणूक नाशिकच्या उद्योग क्षेत्राला मोठी बळकटी देणारी ठरणार आहे.
जिंदाल पॉली फिल्म्सने यापूर्वी आॅगस्ट २०२४ मध्ये विस्ताराबाबतचे संकेत दिले होते. मात्र, २०२३ मधील आगीच्या घटनेतून सावरण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला बराच काळ लागल्याने, कंपनीने आता विस्तार करण्याचे धोरण निश्चित केले आहे. मागणी पुरवठा असंतुलनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत बाजारपेठेतील आपले स्थान आणखी बळकट करताना सर्वात प्रगत नवीन लाइन्स उभारण्याचे ठरविले आहे. ज्यामध्ये उत्कृष्ट रुंदी, आऊटपूट क्षमता, विश्वासर्हता, उपकरणांची गुणवत्ता, तांत्रिक प्रगती आणि ग्राहकांचे समाधान या बाबींचा विचार केला जाणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे रिलायन्स कंपनीची उपकंंपनी असलेल्या 'रिलायन्स लाईफ सायन्सेस प्रा. लि.' या कंपनीने आतापर्यंत ४२०० कोटींची गुंतवणूक जाहीर केली आहे. १६० एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला असून, कंपनीने विस्ताराच्यादृष्टीकोनातून एमआयडीसीकडून अतिरिक्त जागा घेतल्याने, कंपनी आणखी गुंतवणूक वाढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रानुसार, कंपनीकडून टप्प्याटप्प्याने १० हजार कोटींपर्यंत गुंतवणूक वाढविली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विल्होळी परिसरात ग्राफाईट इंडिया लि. या कंपनीचा प्रकल्प उभारण्यात आला असून, कंपनीकडून तीन हजार कोटींची याठिकाणी गुंतवणूक अपेक्षित आहे. १७०० कोटींच्या गुंतवणूक करारावर यापूर्वीच कंपनीने शिक्कामोर्तब केला असल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिकमध्ये मोठ्या समुहांकडून गुंतवणूक केली जावी, यासाठी आम्ही मागील काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. त्याचे फलीत आता समोर येत असून, जिंदालची गुंतवणूक दिलासा देणारी आहे. भविष्यात आणखी इतर मोठ्या समुहांकडून गुंतवणूकींची घोषणा केली जाणार आहे.धनंजय बेळे, माजी अध्यक्ष, निमा, नाशिक.