Land Acquisition Pudhari
नाशिक

Nashik Land Scam | बनावट मालक, बनावट कागदपत्रे अन् कोट्यवधींचा भूखंड घोटाळा

Nashik Land Scam | दोन वकिलांसह १४ जणांच्या टोळीचा पर्दाफाश : संशयित भिवंडीतून जेरबंद, इंदिरानगर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बनावट इसम उभा करून मूळ मालकाच्या नावावरील भूखंड बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या टोळीचा इंदिरानगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन वकिलांसह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासात या टोळीने नाशिक शहरात अशाच प्रकारचे किमान पाच गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

इंदिरानगर ठाणे हद्दीतील चेतनानगर येथील संतोष संजीवा हेगडे यांच्या मालकीचा ५०१ चौ. मी. क्षेत्रफळाचा प्लॉट तसेच वडाळा शिवारातील सुधीर जमनादास गुजराथी यांच्या मालकीच्या जमिनीतील एक भूखंड या टोळीने डोळ्यासमोर ठेवला होता. आरोपींनी मूळ मालकांच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून त्यांच्या आधारकार्डामध्ये फेरफार केला. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड अपडेट करून बँक खाते उघडण्यात आले.

याच बनावट ओळखीच्या आधारे संबंधित भूखंडांची खरेदी-विक्री करण्यात आली. यासाठी मूळ मालक आणि विक्रेता म्हणून उभ्या केलेल्या बनावट व्यक्तींचा वापर करून संपूर्ण कट रचण्यात आला. या प्रकारातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आरोपींनी आधारकार्ड अपडेटसाठी वापरलेल्या कागदपत्रांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राची (गॅझेट) बनावट प्रत तयार केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

या प्रकरणी इंदिरानगर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन वकिलांचा समावेश असून, त्यांनी बनावट कागदपत्रांची पूर्तता आणि व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या तपासात आतापर्यंत १४ जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

त्यामध्ये वकील, जमीन खरेदी-विक्री एजंट, बनावट नावाने उभे करण्यात आलेले इसम तसेच व्यवहारात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचा समावेश आहे. मुख्य आरोपी घटना घडल्यानंतर नाशिकमधून फरार झाले होते. मात्र, गुन्हेशोध पथकाने त्यांचा माग काढत भिवंडी येथून त्यांना अटक केली आहे.

पोलिसांचे आवाहन

या टोळीने नाशिक शहर व परिसरात आणखी अशाच प्रकारचे भूखंड घोटाळे केले असण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. त्यामुळे अशा फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर करांडे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हेशोध पथकाने केली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक संतोष फुंदे व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

या आरोपींचा समावेश

कपिल अरविंद पाठक, अलमास करीम सय्यद (दोघेही वकील), घनश्याम गजाराम गिल, बाबूभाई गुलाबभाई मुलताणी, शोभा शंकर मुकणे (या तिघांनी संतोष संजीवा हेगडे, सुधीर जमनादास गुजराथी, ज्योती संतोष हेगडे ही बनावट नावे धारण केली होती),

रितेश रमेश संसारे, भीमराव कोंडिबा वाघमारे, मुकेश प्रकाश जाधव, रवींद्र हरिदास अडागळे, शरद भास्कर मुठेकर, बासीद करीम सय्यद, नईक करीम सय्यद, करीम शरफोद्दीन सय्यद, फिरोजा करीम सय्यद.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT