घोटी / इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा
घोटी परिसरातील घोटीवाडी परिसरात मुख्य वाहिनीचा वीजप्रवाह उतरलेल्या विजेच्या खांबाला धक्का लागून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. राजेंद्र अशोक भगत (४०, रा. घोटीवाडी, ता. इगतपुरी) असे मृत झालेल्याचे नाव आहे.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ठेकेदार व महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा जीव गेल्याचा आरोप केला आहे. माहितीनुसार, मिळालेल्या घोटीवाडी परिसरात आवादा ग्रीन प्रोजेक्ट या खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून वीज वितरण कंपनीने नवीन विद्युत लाइनचे काम सुरू करून मुख्य वीजवाहिनीचे खांब उभे केले आहेत.
यात ठेकेदाराने सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता मुख्य वीजवाहिनी सुरू केली. कामातील हलगर्जीपणामुळे तसेच निष्काळजीपणामुळे शेतात जात असलेल्या राजेंद्र अशोक भगत याला मुख्य वीजवाहिनीच्या खांबाचा करंट लागल्याने तो जागीच कोसळून मृत पावला. मंगळवारी (दि. २६) पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचे नमूद आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या दुर्दैवी घटनेने तणाव निर्माण झाल्याने नाशिक ग्रामीण पोलिसांनी नाशिक, निफाड, इगतपुरी, वाडीव-हे, सिन्नर आदी परिसरांत पोलिस पथक बंदोबस्तासाठी तैनात केले होते. उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्यासह घोटी पोलिस निरीक्षक विजय शिंदे, इगतपुरी निरीक्षक सारिका आहिरराव, वाडीव-हे निरीक्षक महाजन आदी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. उपनिरीक्षक पी. पी. भिंगारदे अधिक तपास करीत आहेत.
ग्रामस्थ संतप्त; दोषींवर कारवाईची मागणी
राजेंद्र भगत याच्या दुर्दैवी मृत्यूने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. नागरिकांनी आक्रमक होत, भगत याच्या मृत्यूस कारणीभूत वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराविरुद्ध तसेच दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता.