Nashik Homemade Chocolate 
नाशिक

Nashik Homemade Chocolate | चॉकलेट उद्योगामुळे गृहिणी आर्थिकदृष्ट्या सक्षम

Nashik Homemade Chocolate | जागतिक चॉकलेट दिन : डिजिटल माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोच

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अंजली राऊत

लहान-थोरांपासून सर्वांनाच हवेहवेसे वाटणाऱ्या चॉकलेटने शेकडो महिलांच्या आयुष्याला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे. प्राथमिक टप्प्यात घरगुती पातळीवर सुरू झालेल्या चॉकलेट उद्योगामुळे महिला मोठ्या प्रमाणावर आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. चॉकलेट तयार करून महिला दरमहा १० ते ३० हजार रुपयांपर्यंत निव्वळ नफा कमवत आहेत.

सणासुदीच्या काळात तसेच 'चॉकलेट डे'च्या निमित्ताने स्थानिक होममेड चॉकलेटची मागणी ४० ते ५० टक्क्यांनी वाढत असताना, सुमारे ६५ टक्के महिला व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि इतर डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याने या व्यवसायातून अनेक गृहिणी आर्थिकदृष्ट्या पर्याय मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत नाशिक शहर आणि ग्रामीण भागात 'होममेड' म्हणजेच घरगुती चॉकलेटची मागणी प्रचंड वाढली आहे.

सण-उत्सव, वाढदिवस, आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी नागरिक आता ब्रेडेड चॉकलेटऐवजी स्थानिक महिलांनी बनवलेल्या कस्टमाईज्ड चॉकलेट्सना पसंती देत आहेत. या वाढत्या मागणीमुळे नाशिकच्या गृहिणींसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. घर सांभाळून, उपलब्ध वेळेत महिला हा व्यवसाय करत असून, यातून त्यांना दरमहा चांगला आर्थिक हातभार लागत आहे.

नाशिकमधील अनेक महिला बचत गटांनी एकत्र येत चॉकलेटनिर्मितीचे प्रशिक्षण घेतले आहे. वेगवेगळ्या चर्वीचे, आकारांचे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणारे डार्क चॉकलेट, नट्स चॉकलेट आणि शुगर फ्री चॉकलेट बनवण्यावर महिलांचा भर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या उत्पादनांची विक्री थेट ग्राहकांपर्यंत केली जात आहे.

चॉकलेटदिनाच्या निमित्ताने बाजारपेठेत घरगुती चॉकलेट्सना मोठी मागणी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. हा उद्योग केवळ शहरापुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील ग्रामीण भागातही महिला यामुळे आत्मनिर्भर होत आहेत. चॉकलेट उद्योगाने महिलांच्या कष्टाला आणि कौशल्याला एक नवी ओळख मिळवून दिली असून, त्यांच्या प्रगतीचा हा प्रवास इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

'उमेद'च्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत असून, या प्रशिक्षणांमध्ये अन्न प्रक्रिया, हस्तकला आणि चॉकलेट मेकिंगचाही समावेश असतो. यामध्ये चॉकलेट वितळणे, टेम्परिंग, मोल्डिंग, विविध फ्लेवर्स (नट्स, ट्रफल्स) तयार करणे, आकर्षक पॅकेजिंग आणि विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले जात आहे.

चॉकलेटचा गोडवा हा फक्त त्याच्या चवीमध्येच नाहीतर येथे काम करणाच्या प्रत्येक महिलाच्या स्वालंबनातही दिसून येतो. विविध भागातून महिला आमच्या चॉकलेट कंपनीत काम करण्यासाठी येतात. येथे बल्क चॉकलेट मॅन्युफॅक्चरमध्ये काम केले जाते. नाशिक, मालेगाव, सटाणा, धुळे जिल्ह्यापासून राज्यभरात निर्यात होते. सणासुदीत आंबा, स्ट्रॉबेरी, सुकामेवा या फ्लेवर्समध्ये मोदकाचे चॉकलेट बनविले जातात. दीपावलीमध्ये फटाक्यांच्या शेपमध्ये असणाऱ्या चॉकलेट्सना मागणी असते.
सुनयना मदन, चॉकलेट कंपनी मालक, अंबड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT