वणी : वणी आणि परिसरातील शेतकऱ्यांवर परतीच्या पावसाने २५ ऑक्टोबर २०२५ रोजी अचानक मोठे संकट कोसळले आहे. दुपारपासून सुरू झालेल्या आणि रात्री अचानक मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या या धँवाधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे जीवन अक्षरशः मेटाकुटीला आले आहे.
वणीला लागून असलेली पांडाणे, जिरवाडे पुणेगांव अहिवंत वाडी, तसेच मांदाणे अशा अनेक भागांमध्ये पावसाने हाहाकार माजवला. रात्रीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या असलेल्या टोमॅटोच्या पिकाला मोठा फटका बसला असून, शेतांमध्ये पाणी साचल्याने टोमॅटोची झाडे तुटून पडली आणि पीक सडून मातीमोल झाले आहे. हाता-तोंडाशी आलेले टोमॅटोचे उत्पादन क्षणात नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
केवळ टोमॅटोच नाही, तर द्राक्षाच्या झाडांनाही या पावसाने प्रचंड हानी पोहोचवली आहे. यासोबतच, लागवडीसाठी तयार केलेली कांद्याची रोपेही पावसामुळे करपली गेली असून, अनेक ठिकाणी ती पाण्यात सडली आहेत. रात्री धुवाधार झालेल्या या पावसामुळे परिसरातील इतर पिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सततच्या पावसामुळे अगोदरच वैतागलेल्या शेतकऱ्यावर आता परतीच्या पावसाने कहर केला असून, या अचानक आलेल्या संकटाने शेतकऱ्यांची मोठी त्रेधा तिरपीठ उडाली आहे. या अतोनात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची दैना झाली असून, सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी बळीराजाकडून होत आहे.