

वणी (नाशिक): वणी शहरात “जुने रेशनकार्ड बंद होणार असून, आता नवीन स्मार्ट रेशनकार्ड काढणे बंधनकारक आहे” असे खोटे सांगून काही तरुणांनी नागरिकांची आर्थिक लूट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या या “तुमचे कार्ड स्मार्ट करून देतो”
नागरिकांकडून प्रत्येकी १०० रुपये आकारून फक्त वहीत माहिती लिहून घेतली जात होती. बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळपासून वणी येथील स्वस्त धान्य दुकानांच्या समोर काही तरुण नागरिकांना “तुमचे कार्ड स्मार्ट करून देतो” असे सांगत बसले होते. रेशन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून त्यांनी प्रत्येकी शंभर रुपये घेतले आणि त्यांची नावे वहीत नोंदवली.
जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी ?
शासनाच्या योजनांविषयी पुरेशी माहिती नसल्याने अनेक भोळ्या भाबड्या नागरीकांनी पैसेही देऊ केले. ही बाब काही सुजाण नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. प्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता एका तरुणाने आपले नाव शुभम घुले असे सांगितले. त्याने “आमचे सीएससी सेंटर आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आहे” असा दावा केला. मात्र अधिक विचारणा केली असता तो गोंधळात पडला आणि वेगवेगळी उत्तरे देऊ लागला.
पत्र घेऊन तो परतलाच नाही
स्वस्त धान्य दुकानदारांकडे विचारणा केली असता त्यांनी या प्रकाराबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. शुभम घुले याने “माझ्याकडे पत्र आहे, ते घेऊन येतो” असे सांगून निघून गेला. नंतर त्याने फोन करून “पत्र घेऊन येतो” असे सांगितले, मात्र तो परतला नाही. या प्रकरणाची माहिती वणी पोलीस ठाण्याच्या सपोनी गायत्री जाधव यांना देण्यात आली. त्यांनीही संबंधितांकडे चौकशी केली असता तेच दावे पुन्हा करण्यात आले. “आम्ही पूर्ण जिल्ह्यात काम करतो” असा दावा करून त्यांनी आपला पवित्रा कायम ठेवला.
अफवांना बळी पडू नये - वणी पोलिसांचे आवाहन
दरम्यान, दिंडोरी तालुका पुरवठा अधिकारी अक्षय लोहकर यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की, “अशा प्रकारचा कोणताही शासनाचा कार्यक्रम किंवा योजना सध्या सुरू नाही. नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये.”या फसवणुकीत वापरलेली एम.एच. १५ जे.एम. ४०७८ ही कार घटनास्थळी दिसून आली होती. मात्र चौकशी सुरू होताच संबंधित व्यक्ती कार घेऊन पसार झाले. पुढील तपास वणी पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, हजारो रेशनकार्ड धारकांना फसवण्याचा नव्या पद्धतीचा प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद व्यक्तींना पैसे न देता थेट स्वस्त धान्य दुकान किंवा पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“स्मार्ट रेशनकार्ड हे मोफत डाउनलोड करता येते. त्यासाठी कोणतीही सक्ती नाही. असे कोणी चुकीच्या पद्धतीने पैसे मागून कार्ड देण्याचे आश्वासन देत असेल, तर नागरिकांनी फसू नये. आमच्या विभागाकडून अशा प्रकारची कोणतीही योजना सुरू नाही. वणी येथे घडलेला प्रकार चुकीचा आहे. अशा कोणत्याही घटनेबाबत तात्काळ तहसीलदार किंवा पुरवठा शाखेशी संपर्क साधावा.”
अक्षय लोहकर, पुरवठा शाखा, दिंडोरी