Girish Mahajan Pudhari
नाशिक

Nashik Rain Update | नागरिकांनी तूर्तास पावसाळी पर्यटन टाळावे : मंत्री गिरीश महाजन

Nashik Rain Update | हा पट्टा आता दक्षिणेला अहिल्यानगरकडे, तर पश्चिमेला सूरतकडे सरकला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक ग्रामीण, पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली होती. हा पट्टा आता दक्षिणेला अहिल्यानगरकडे, तर पश्चिमेला सूरतकडे सरकला आहे.

त्यामुळे अतिवृष्टीचे संकट टळले असले, तरी पुढील तीन दिवस नागरिकांनी पर्यटनस्थळे, धबधबे या परिसरात जाऊ नये, असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. जिल्ह्यास अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन हे सोमवारी (दि. ६) रात्रीच नाशिकमध्ये दाखल झाले.

त्यांनी रात्रीच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी जिल्हा प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी (दि.७) दुपारी मंत्री महाजन यांनी पालघरकडे रवाना होण्यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथे पुन्हा भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री महाजन यांनी सांगितले की, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अशा परिस्थितीत पावसाळी पर्यटन, धबधबे, गडकिल्ले, धरण परिसर, नदी काठावर जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगीदेवीचे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

तसेच भावडबारी रस्ता बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. रस्त्यांवरील दगड, माती तातडीने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हा प्रशासन सतर्क असून, त्यांनी कार्यवाही केली आहे, असेही मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT