नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यावर घोंगावणारे ढगफुटीचे संकट टळले असले तरी घाटमाथा तसेच नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी भूस्लखन झाले तर काही ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. काही पर्यायी पूल वाहून गेल्याने संबंधित गावांचा संपर्कही तुटला.
हवामानाचा अंदाज घेऊन प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून सातवीपर्यंतच्या शाळा बुधवारी (दि. ८) देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच घाट परिसर, धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स व पूर प्रवणस्थळे पर्यटनासाठी दि.१३ जुलैपर्यंत प्रतिबंधित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी (दि. ७) घाटमाथ्यासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि नाशिक तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला.
इगतपुरीत तब्बल २०० मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर चांगला असला तरी कुठेही ढगफुटीसदृश परिस्थिती नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मुसळधार पावसाने त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले. प्रयागतीर्थ ते तळवाडे रस्ता पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पहिणे-भिलमाळ मार्गावरील तात्पुरता पूल वाहून गेला. कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, तर कोटंबी घाटातील दगडी बांधही कोसळला.
इगतपुरी तालुक्यात नांदगाव-सदो येथे सखाराम बागडे यांच्या घराची भिंत कोसळली. उभाडे येथेही एका घराच्या भिंतीचे नुकसान झाले. अस्वली जानोरीला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला. कळवण तालुक्यात चार घरांची पडझड झाली. चार विहिरींचे नुकसान झाले. सुरगाण्यात कवेली घाटात दरड कोसळली. देवळा तालुक्यातील भावडबारी घाटही खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध ठिकाणी पाहणी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर विभागांचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले. इगतपुरी येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) पथक तैनात करण्यात आले आहे. आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, संवेदनशील भागांवर सातत्याने नजर ठेवली जात आहे.