नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क - नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला असून, खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. येवला, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, मालेगाव, निफाड, सिन्नर, इगतपुरी, चांदवड आणि बागलाण या भागात मका, सोयाबीन, कांदा, भुईमूग, टोमॅटो, बाजरी, मूग, उडीद, द्राक्षे, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक पिके आहेत. शेतपिकांसह पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला असून, खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांवरच परिणाम झाला नाही तर ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होऊन दैनंदिन जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील काही भागात काढणीसाठी आलेले लाल कांद्याचे पीकामध्ये देखील पाणी साचल्याने पिके खराब होण्याचा धोका आहे. लागवड केलेले कांदे खराब होत असून, येत्या काही महिन्यांत उत्पादन कमी होण्याची शेतकऱ्यांकडून भीती दर्शवली जात आहे. त्याचप्रमाणे काढणीनंतर शेतात उरलेल्या सोयाबीनचेही नुकसान होत असून, काढणी न झालेली पिके पावसाचा जोर कायम राहिल्यास काळी पडण्याचाही धोका आहे.
दिवाळीच्या आसपास काढणी अपेक्षित असलेल्या मक्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मुसळधार पावसामुळे मका शेतात पाणी साचले असून, कापणीपूर्वी अंकुर फुटण्याचा धोका वाढला आहे. पूर्ण बहरात असलेल्या आणि सध्या चांगला भाव मिळणाऱ्या टोमॅटो पिकाला देखील सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोपांच्या मुळापासून वर आलेला पिकांचा भाग पावसामुळे खराब होत असून पिकांवर आलेल्या काळसर बुरशीमुळे पिकांची निर्यात गुणवत्ता कमी होईल तर पावसानंतरच्या उष्णतेमुळे भुरी आणि करपा यांसारख्या रोगांचा धोका वाढेल. त्यामुळे फुलांच्या कळ्या आणि मुळांचे संपूर्ण नुकसान होऊ शकते, परिणामी पाने पिवळी पडतात आणि पीके निकामी होत आहेत.
पावसामुळे छाटणीची कामे लांबल्याने द्राक्ष उत्पादकांनाही मोठा फटका बसला आहे. या विलंबामुळे एकाच वेळी छाटणीचा हंगाम येऊ शकतो, ज्यामुळे द्राक्षाच्या किमती कमी होऊ शकतात. एकूणच, परतीच्या पावसाने नाशिकच्या कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झालेले पहावयास मिळत आहे.