

नाशिक : शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या परतीच्या पावसाने शेतमालासह पशुधनाचे नुकसान झाले. तालुक्यातील खंबाळे येथे वीज पडून गाय, तर सोनांबे येथे म्हैस ठार झाल्याची घटना घडली.
सोमवारी (दि. २३) दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर रात्री ९ च्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात होऊन जवळपास दोन तास पाऊस सुरू होता. त्यानंतर मंगळवारी (दि. २४) पुन्हा दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली, जवळपास तासभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा रात्री शहरासह तालुक्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली.
सध्या तालुक्यात सोयाबीन, मका, बाजरी, सोंगणीचे काम सुरू असून अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. त्यात शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन, मक्याचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. त्यात मंगळवारी (दि. २४) रात्री २.३० च्या सुमारास खंबाळे येथील रामदास पांडुंग सोनवणे यांच्या घराजवळ बांधलेल्या गायीवर वीज पडून मृत्त्यू झाला, तर सोनांबे येथील किरण रामू घोडे यांच्या म्हशीचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.