नाशिक : अतिवृष्टी, पुराने शेती पिकाचे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे सुरू असताना, राज्य शासनाने आता अतिवृष्टी अन् महापूराने नुकसान झालेल्या शासकीय मालमत्तेची माहिती मागविली आहे. शासनाने ग्रामविकास विभागासह सर्वच विभागांना पत्र देत, झालेल्या हानाची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्ते, अंगणवाड्या, जिल्हा परिषदेच्या शाळा आदींचा समावेश आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेला पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार माहिती गोळा करण्यास संबंधित यंत्रणांकडून प्रारंभ झाला आहे.
नाशिक जिल्ह्याला गत आठवड्यात पावसाने चांगलेच झोडपले. दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने शेतात पाणी साचले, निफाड, येवला तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटी झाली. त्यामुळे जमीन वाहून गेली. याचा फटका खरीप हंगामातील लागवड झालेल्या पिकांना बसला आहे.पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र, या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात रस्ते, पूल, बांधकामे, इमारती, विद्यूत यंत्रणा, सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गावांमधील अंगणवाड्या, जि. प. शाळा यामध्ये पावसाचे पाणी शिरले. काही ठिकाणी भिंती कोसळल्या तर, काही ठिकाणी पत्रे उडून गेली आहेत. महापूराने चांदोरी, सायखेडा गावात पाणी शिरल होते. या महापूराने रस्ते खचले आहे तर, कुठे रस्ते हे वाहून गेले आहेत. या शासकीय मालमत्तेच्या पुनर्उभारणीसाठी या नुकसानीचा परिपूर्ण अहवाल शासनाकडे सादर झाल्यास आवश्यक निधी मिळविता येईल. त्यासाठी जिल्हयातील शेती, घरे, रस्ते, पूल, विद्युत यंत्रणा आणि इतर सार्वजनिक मालमत्ता यांचे झालेल्या नुकसानाची अहवाल राज्य शासनाने मागविला आहे. यात, 30 टक्के, 30 ते 50 टक्के, 50 टक्यांपुढील नुकसान असा तपशील सादर करावयाचा आहे.
या मालमतेची मागविली माहिती
जिल्हा परिषद : शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक कार्यालये, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालये, ग्रामसेवक कार्यालय, समाजमंदिर, स्मशानभूमी, गाव रस्ते, जोड रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना.
सार्वजनिक बांधकाम : पूल, इतर जिल्हा मार्ग, मुख्य जिल्हा मार्ग, राज्य महामार्ग, राज्य महामार्ग जोडणी रस्ते, सार्वजनिक कार्यालये, अंडर ब्रीज, जोड रस्ते.
जलसंधारण : पाझर तलाव, लघु पाटबंधआरे प्रकल्प, विहिर, शेततळे, जमीन खरडून जाणे, शेत जमिनीवर गाळ साचणे.
जलसंपदा : कालवे, धरणे, मध्यम पाचबंधारे प्रकल्प
उर्जा : वीज खांब, डीपी, उपकेंद्रे, कंट्रोल टाॅवर.
नगरविकास (मनपा, नगरपालिका, नगरपरिषद) : रस्ते, सार्वजनिक इमारती, स्माशनभूमी
कृषी : बियाणे
अन्न नागरी पुरवठा : अन्नधान्य, अतिवृष्टीने बाधित, पूरामुळे बाधित कुटुंब.