चांदवड : चांदवड तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने पिके सुकून गेली होती. अखेर १५ दिवसांनंतर शुक्रवारी (दि.१५) पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. विशेषतः सोयाबीन व मका या पिकांना या पावसामुळे मोठा फायदा होणार आहे.
पावसाच्या उशिरामुळे पेरणीनंतर उगवलेली पिके सुकण्याच्या मार्गावर होती. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, आज (शुक्रवारी) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे या पिकांना जीवदान मिळणार आहे. उत्पादनावर होणारा संभाव्य परिणाम टळण्याची शक्यता आहे. जरी पावसाने पिकांना दिलासा दिला असला तरी तालुक्यातील बहुतांश नदीनाले, गट तलाव आणि बंधारे अद्याप कोरडेच आहेत. भूजल पातळीही खालावल्याने पाणीटंचाईची स्थिती कायम आहे. त्यामुळे आगामी काळात अधिक प्रमाणात व सतत होणाऱ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांत चांदवड परिसरात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने पुन्हा एकदा पिकांवर लक्ष केंद्रित करत मशागतीची कामे व खते व्यवस्थापनाची तयारी सुरू केली आहे.