नाशिक : पुढारी वृत्तसेवा
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झालेल्या श्री संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य विभागाने वारी मार्गावर अखंड आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्याचे व्यापक नियोजन केले आहे.
आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पालखी मार्गावर १०८ व १०२ रुग्णवाहिकांसह जिल्हा परिषद सेस निधीतून उपलब्ध करून दिलेली एक अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका तैनात असेल. याशिवाय, दिंडीसोबत २ वैद्यकीय अधिकारी, २ समुदाय आरोग्य अधिकारी, १२ आरोग्य कर्मचारी आणि २ रुग्णवाहिकांचे विशेष फिरते पथक पंढरपूर ते परतीचा प्रवासापर्यंत वारकऱ्यांच्या सेवेत कार्यरत राहील.
मुक्कामाच्या ठिकाणी महिलांसाठी 'हिरकणी कक्ष' उपलब्ध असेल. तसेच, आरोग्यदूतांच्या माध्यमातून उष्माघात, सर्पदंश, प्रथमोपचार व वैयक्तिक स्वच्छता या विषयांवर वारकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. पालखी उपकेंद्रांमध्ये जीवनरक्षक औषधांचा साठा उपलब्ध असून, वारकऱ्यांच्या सोयीसाठी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक असलेले माहितीफलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
शुद्ध पाणी, स्वच्छतेवर भर
संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी मार्गावरील पाणी स्रोतांची तपासणी व शुद्धीकरण करण्यात आले आहे. यासाठी विशेष आरोग्यदूतांची नियुक्ती करण्यात आली असून, ते नियमित पाण्याचे नमुने तपासतील. मुक्कामाच्या ठिकाणी धूर व कीटकनाशक फवारणीसह स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारकऱ्यांशी सौजन्यपूर्ण व संवेदनशील वर्तन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. - डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदhttps://www.youtube.com/watch?v=WRMgSk_WcGs