नाशिक : जीएसटी तपास लवकर करण्याच्या बदल्यात सव्वा कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीस न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यामुळे राज्य कर विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने जीएसटी कार्यालयातील इन्व्हेस्टिगेशन टीममधील १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची शनिवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. या लाचखोरांच्या घरी तपासणी केली असता बँकेची कागदपत्रं व रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणात राज्य कर उपआयुक्त सोमनाथ पागे, सहायक आयुक्त मच्छिंद्र दोंदे व त्यांच्यातर्फे लाच घेणारा अमित जाधव (३६) यास तक्रारदाराकडून २० लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.
नाशिकमधील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर जीएसटी संदर्भातील तपास सुरू होता. हा तपास लवकर करण्यासाठी पागे व दोंदे यांनी एक कोटी २५ लाख रुपयांची लाच मागितली होती.
यानंतर तक्रारदाराने १ मार्चला मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने ४ मार्चला पडताळणी केली. यावेळी संबंधितांनी तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून २० लाखांची मागणी केली.
शुक्रवारी २० लाख रुपये स्वीकारण्यासाठी आलेल्या अमित जाधव यास एसीबीने दुपारी रंगेहाथ पकडले. दुपारी ३.१५ ला पागे आणि दोंदे यांनाही ताब्यात घेतले. संशयित आणि खासगी व्यक्तीचे मोबाइलही जप्त केले असून, त्यांच्या निवासस्थानाची तपासणी करण्यात आली.
ही कारवाई अपर आयुक्त अनिल घेरडीकर व सहायक पोलिस आयुक्त विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या टीमवरच एसीबीने धाड टाकल्यामुळे टीमच्या कार्यपद्धतीवर संशय उपस्थित होत आहे.