देवगाव (त्र्यंबकेश्वर, नाशिक ) : यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा थेट परिणाम द्राक्ष निर्यातीवर होताना दिसत आहे. द्राक्ष बागायतदार संघाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार आज अखेर राज्यभरातून केवळ ९,४३५ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या सुमारे ४२ हजारांवर होती.
गेल्या हंगामात राज्यातून १ लाख ९३ हजार ६९९ टन द्राक्षांची निर्यात झाली होती. मात्र, यावर्षी हवामानातील अनिश्चितता, सततची अतिवृष्टी, तसेच बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी द्राक्षांच्या घडांची गुणवत्ता खालावली असून, निर्यातक्षम द्राक्षे कमी प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
द्राक्ष निर्यात प्रामुख्याने जानेवारीच्या मध्यापासून सुरू होणार असून, फेब्रुवारीच्या मध्यावर निर्यातीला खरा वेग येतो. मात्र सध्या वाढत असलेली थंडी, ढगाळ हवामान आणि तापमानातील चढ-उतारामुळे उत्पादनात आणखी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा थेट फटका निर्यातक्षम द्राक्षांच्या उपलब्धतेवर बसणार आहे.
युरोपियन देशांसह आखाती राष्ट्रांमध्ये भारतीय द्राक्षांना मोठी मागणी असते. दर्जेदार, गोड आणि टिकाऊ द्राक्षांसाठी परदेशी बाजारपेठेत भारताची वेगळी ओळख आहे. तथापि, निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा ही मागणी पूर्ण करणे अवघड ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यातीचे ठरवलेले उद्दिष्ट गाठणे यावर्षी आव्हानात्मक ठरणार असल्याचे द्राक्ष बागायतदार आणि निर्यातदारांकडून सांगण्यात येत आहे.