नाशिक

Nashik | पुणे, नागपुरात गुंडांची परेड; नाशिकमध्ये कधी?

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारीची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी शहरातील सर्व टॉप मोस्ट भाई, दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची परेड घेतली. रेकॉर्डवरील या सर्व सराईत गुन्हेगारांना सज्जड दम भरत शहरवासीयांना एकप्रकारे सुरक्षेची हमी दिली. पुणे, नागपूर पोलिसांच्या या कामगिरीचे राज्यभर कौतुक होत असतानाच, नाशिक पोलिस हे शहरातील भाई, दादांच्या मुसक्या आवळण्यासाठी अशा प्रकारचे पाऊल उचलणार काय? असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारी प्रचंड बोकाळली असून, भाई, दादा आणि त्यांच्या पंटरनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. चेनस्नॅचिंग, मुलींची छेड काढणे, खंडणी, दरोडे, हत्या हे प्रकार नित्याचेच झाले असून, नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील गल्लीबोळात भाई, दादा निर्माण झाले असून, त्यांच्या पंटरकडून गुन्हेगारीचे सातत्याने उदात्तीकरण करणाऱ्या त्यांच्या रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे स्वयंघोषित भाई, दादा शहरातील राजकारण्यांच्या मागे-पुढे वावरत असल्याने, जणू काही त्यांनी गुन्हेगारीचा परवानाच मिळवला आहे. या सर्व भाई – दादांच्या मुसक्या आवळण्याची गरज असून, नाशिक पोलिस पुणे, नागपूर पोलिसांप्रमाणेच या गुंडांची परेड घेणार काय? असा सवाल नाशिककरांकडून केला जात आहे.

जेलमधून सुटताच 'भाई'च्या रील्स
शहरातील स्वयंघोषित भाई असलेला सराईत गुन्हेगार कित्येक काळ कारागृहात होता. काही दिवसांपूर्वीच एका गुन्ह्यातून त्याची मुक्तता झाली. आता हा भाई सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. त्याच्या पंटरकडून भाई किती दिलदार आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाईचे राजकारण्यांसोबतचे फोटोज व्हायरल केले जात आहेत. 'भाई इज कमबॅक' अशाही पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

गुन्हेगारांवर राजकीय वदहस्त
२०२४ हे वर्ष निवडणुकांचे असल्याने, शहरातील बहुतांश राजकारण्यांनी सराईत गुन्हेगार पाळून ठेवल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत, ते गुन्हेगार राजकारण्यांच्या मागे-पुढे फिरताना दिसून येत आहेत. राजकारण्यांच्या नावाने दमबाजी करणे, खंडण्या वसूल करणे, टोळीयुद्ध असे प्रकार शहरात नित्याचेच झाले आहेत.

निवडणुकीच्या रिंगणात गुन्हेगार
खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले बरेच सराईत आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काही थेट निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश करणार आहेत. बऱ्याच गुन्हेगाऱ्यांनी बड्या पक्षांमध्ये प्रवेश करून, आपली दावेदारी पेश केली आहे. प्रभागात विविध उपक्रमही या मंडळींकडून राबविले जात आहेत. मात्र, दहशत पसरवणे हा एकमेव अजेंडा यांचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरुच आहेत. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्या आणखी तीव्र केल्या जाणार आहेत. पुणे नागपूरमध्ये गुन्हेगांराची परेड घेतली गेली. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आल्यानंतरच नाशिकमध्येही अशाप्रकारची परेड घेतली जाईल. तोपर्यंत नियमित कारवाया तीव्र पध्दतीने राबविल्या जातील. – संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT