नाशिक : धनत्रयोदशीला धनाची आणि धन्वंतरीची पूजा केली जात असल्याने दिवाळी सणात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे अनेकांकडून मुहूर्त साधला जातो. सध्या सोने-चांदींच्या दरांनी माेठी उसळी घेतली आहे. मात्र, अशातही मुहूर्तावर सोने खरेदीस प्राधान्य दिले जात असल्याचे मुहूर्तावर दिसून आले. मुहूर्तावर सोने दरात किंचित घसरण झाल्याने, ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.
सोन्याबरोबरच-चांदीचे दर सध्या सर्वकालीन उच्चांकावर आहेत. चांदीच्या दराने दोन लाखाचा टप्पा यापूर्वीच पार केला आहे. तर सोने दीड लाखाच्या दिशेने आगेकूच करीत आहे. दरम्यान, धनत्रयोशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी (दि.१७) २४ कॅरेट सोने प्रति तोळा जीएसटीसह एक लाख ३५ हजार १४० रुपयांवर होते. २२ कॅरेट सोने प्रति तोळा जीएसटीसह एक लाख २४ हजार ३२० रुपयांवर होते. तर चांदी प्रति किलो जीएसटीसह एक लाख ८५ हजार ४०० रुपयांवर होती.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दरात किंचितशी घसरण झाली. शनिवारी (दि.१८) २४ कॅरेट सोन्याने प्रति तोळा जीएसटीसह एक लाख ३१ हजार ६०० रुपयांचा दर नोंदविला तर, २२ कॅरेट सोने प्रति तोळा जीएसटीसह एक लाख ११ हजार ८०० रुपयांवर होते. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. दोन लाखांचा टप्पा पार करणाऱ्या चांदीने मुहूर्तावर प्रति किलो जीएसटीसह एक लाख ५३ हजारांचा दर नोंदविला.
दरम्यान, मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याने, ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मागील काही दिवसांपासून सोने-चांदी दर गगणाला भिडले आहेत. सातत्याने दरात वाढ होत असल्याने, सोने-चांदी खरेदी करणे सर्वसामांन्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मात्र, गुंतवणूकीसाठी सोन्याबरोबरच चांदीही उत्तम पर्याय ठरू लागल्याने आणि मुहूर्तावर खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने सराफ बाजारातील उलाढाल कोट्यावधींच्या रुपयांच्या घरात जात आहे.
सराफ बाजार ग्राहकांनी फुलले
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सराफ बाजारात ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. सकाळी ८.५० ते १०.३३ असा पहिला मुहूर्त होता. त्यानंतर सकाळी ११.४३ ते दुपारी १२.२८ हा दुसरा मुहूर्त होता. तसेच सायंकाळी ७.१६ वाजेपासून ते रात्री ८.२० वाजेपर्यंत मुहूर्त असल्याने सोने-चांदी घरेदीसाठी ग्राहकांनी केलेल्या गर्दीमुळे सराफ बाजार फुलला होता.