नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कुंभमेळ्यासाठी रस्ते रुंदीकरणासाठी मनपाकडून सर्रास कत्तल करण्यात आलेल्या वृक्षांना विविध पक्षसंघटना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.८) गंगापूर रोडवर शोकसभा घेत नाशिक महापालिकेच्या भूमिकेचा निषेध केला.
ही वृक्षतोड नसून झाडांची कत्तल असल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे. उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२४ ला दिलेल्या आदेशात काही विशिष्ट रस्त्यांवरील झाडे तोडण्यास मनाई केली होती. त्यामध्ये विशेषतः वड, पिंपळ, औंदुबर यांसारख्या झाडांचे संरक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.
या झाडांची छाटणी करता येणार नाही तसेच कोणतेही झाड तोडण्यापूर्वी तज्ज्ञ समितीची शिफारस, पुनर्लागवड आणि दीर्घकालीन देखभाल अनिवार्य करण्यात आली होती. असे असताना देखील न्यायालयीन नियमांकडे दुर्लक्ष करून केलेली वृक्षतोड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा दावा या शोकसभेत करण्यात आला.
विशेषतः रस्त्यांच्या मधोमध असलेली आणि नैसर्गिक डिव्हायडर म्हणून शहरातील काम करणारी तब्बल १३५ झाडेही निर्दयीपणे तोडण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पोलिस प्रशासनदेखील मनपाला साथ देत आहे.
पोलिसांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी व पर्यावरणप्रेमींची माफी मागावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली. संबंधित मनपा अधिकाऱ्यांचे निलंबन, चौकशी, पासपोर्ट जप्ती आणि गुन्हे दाखल करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आली आहे. तसेच तोडलेल्या झाडांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक प्रजातींची पुनर्लागवड करण्याचीही मागणीदेखील केली आहे.