नाशिक : १७५ कोटींच्या गंगापूर धरण थेट जलवाहिनी योजनेच्या कामातील कथित भ्रष्टाचाराची तक्रार आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे मांडल्यानंतर या प्रकरणाची कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्यामार्फत चौकशी करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली.
नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. १९९७ ते २००० दरम्यान गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १२.५ किलोमीटर लांबीची सीमेंटची जलवाहिनी टाकण्यात आली होती. ही जलवाहिनी २०२१ पर्यंतच्या अंदाजित २१ लाख लोकसंख्येच्या दृष्टीने टाकली होती. गेल्या २३ वर्षांत या जलवाहिनीची वहनक्षमता मोठ्या प्रमाणावर कमी होऊन गळतीचे प्रमाण मात्र वाढले.
त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत. शहराची वाढती लोकसंख्या आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने लोखंडी थेट जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी १७५ कोटींच्या योजनेला मंजुरी मिळाली. ठेकेदाराला कार्यारंभ आदेशही दिला. मात्र, नऊ महिने उलटूनही इंचभरदेखील काम झालेले नसताना ७५ कोटी रुपये अदा केले गेले. आता पाइपच्या आकारात परस्पर बदल केला गेला. यामुळे यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ॲड. ढिकले यांनी लक्षवेधीद्वारे केला. त्यावर नगर विकासमंत्री माधुरी मिसाळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
गंगापूर धरण थेट पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यामार्फत चौकशी होऊन या प्रकरणातील भ्रष्टाचार बाहेर येईल.ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व.