नाशिक : नाशिक शहरासह धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. जुनमध्येच गंगापूर धरण ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याने, विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी (दि.२१) दुपारी १२ वाजता विसर्गात ११६० क्युसेकने वाढ करून २३२० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.
जोरदार पावसामुळे शुक्रवारी (दि. २०) सकाळी ९ वाजेपासूनच धरणातून एक हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता तर, नाशिकमधील इतर चार धरणांमधूनही पाणी सोडण्यात आले. शनिवारी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत घट झाली. शुक्रवारी सकाळी ६ वाजता गंगापूर धरणातून ५०० क्यूसेक, तर सकाळी ९ वाजता एक हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. या विसर्गासाठी गंगापूर धरणाच्या ९ दरवाजांपैकी तीन दरवाजे उघडण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी १२ वाजता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग ११६० क्युसेकवरून दोन हजार ३२० क्यूसेस करण्यात आला. सध्या गंगापूर धरणात ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा ४२ टक्क्यांवर गेला आहे.
जिल्ह्यातील इतर पाच धरणातून देखील पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दारणा धरणातून ४,७४२ क्यूसेक, तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी रात्री ९ वाजता ९,४६५ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. कादवातून ५३० क्युसेक, पालखेड धरणातून १,३५० क्युसेक, तर होळकर पुलाखालून १४४६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.