Gangapur Dam  Pudhari photo
नाशिक

Gangapur Dam Water | गंगापूर धरणात खोदणार चर

Gangapur Dam Water | पाणीकपातीचे संकट टाळण्यासाठी पाणीपुरवठा विभागाची उपाययोजना

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गतवर्षी गुंडाळण्यात आलेला गंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबण्याची शक्यता असल्यामुळे मंजूर पाणी आरक्षण ३१ जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्याचे निर्देश जलसंपदा विभागाने महापालिकेला दिल्याने अस्तित्वातील १८ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी पाणीकपात करण्याऐवजी गंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव पुन्हा पुढे आला आहे.

धरणात जॅकवेलपर्यंत चर खोदल्यास ६०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असल्याने पाणीकपातीचे संकट टळू शकणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणांतून महापालिकेने ६४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली होती. ती जिल्हा प्रशासनाने मान्य केली.

सद्यस्थितीत नाशिक शहराला धरणातून दररोज ६०० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जात आहे. यंत्रणेतील गळतीमुळे नागरिकांना मुबलक पाणी असूनही कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात हवामान खात्याने यंदा अल निनोमुळे पावसाचे उशिरा आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पाणी आरक्षण ३१ जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे निर्देश जलसंपदा विभागाने महापालिकेला दिले आहेत.

सद्यस्थितीत १२ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढेच पाणी आरक्षण शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित १८ दिवसांचा तुटवडा भरून काढण्यासाठी पाणीकपात करावी लागणार आहे. आधीच कृत्रिम पाणीकपात सोसत असलेल्या नागरिकांच्या संतापाचा यामुळे कडेलोट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी कपातीऐवजी चर खोदून धरणातील मृतसाठा उचलण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.

मृतसाठा वापरण्याचा विचार

अल निनोचा धोका ओळखत जलसंपदा विभागाने महापालिकेला ३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सद्यस्थितीत १८ दिवसांची तूट आहे. ती भरून काढण्यासाठी धरणातील मृतसाठा वापरण्याचा विचार असून, चर खोदावी लागणार आहे, त्यासाठी सल्लागाराच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

सल्लागार देणार अहवाल

गंगापूर धरणाची पाणीपातळी ५९८ मीटर खाली गेल्यास पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे धरणात चर खोदून मृतसाठा जॅकवेलपर्यंत आणण्याचा प्रस्ताव आहे. चर खोदण्याच्या मार्गात महाकाय खडक अडथळा ठरत आहे. धरण मातीचे असल्याने हा खडक फोडण्यासाठी डिटोनटर्सचा वापर केल्यास धरणाला हादरा बसण्याची शक्यता आहे.

त्यामुळे तंत्रशुद्ध पद्धतीने खडकाचा अडथळा दूर करण्यासाठी फोरस्ट्रेस या सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या सल्लागारामार्फत धरणात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असून, बोअर यंत्राद्वारे खडकाची व्याप्ती तपासून तसा अहवाल पाणीपुरवठा विभागाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर चर खोदकामाबाबतचा निर्णय होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT