नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय झालेल्या गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक, तरुण भेट देतात. मात्र, पाण्याची खोली, अचानक बदलणारा तळ, चिखलयुक्त भाग आणि धोकादायक उतारामुळे परिसरात वारंवार अपघात घडत असल्याचे दिसून येते.
गेल्या काही वर्षांत गंगापूर धरण, बॅकवॉटर आणि परिसरातील जलाशयांत बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पावसाळा आणि उन्हाळ्यातील सुट्यांच्या काळात पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर अशा दुर्घटनांत वाढ होत असल्याचे दिसून आले. काही प्रकरणांत सेल्फी काढताना, पोहण्यासाठी पाण्यात उतरल्याने किंवा नौकाविहारासारखे धोकादायक प्रकार केल्याने जीवितहानी झाली आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून अनेकदा धरण परिसरात सुरक्षारक्षक, चेतावणी फलक, प्रतिबंधात्मक कुंपण, सीसीटीव्ही आणि नियमित गस्तीची मागणी करण्यात आली आहे. मात्र विस्तीर्ण परिसर आणि मोठा जलसाठ्यामुळे संपूर्ण क्षेत्रावर नियंत्रण ठेवणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या परिसरात जलसंपदा विभागाने धोक्याची सूचना देणारे फलक लावलेले आहेत. तरीही अनेक पर्यटक सूचनांकडे दुर्लक्ष करून पाण्याच्या जवळ जात असल्याचे आढळते.
प्रभावी उपाययोजनांची गरज
तज्ज्ञांच्या मते, धरण परिसरातील पाण्याचा अंदाज वरून बांधणे कठीण असते. अनेक ठिकाणी अचानक खोल खड्डे, चिखलाचा तळ आणि पाण्याखालील प्रवाह असल्याने अनुभवी व्यक्तीलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मद्यप्राशन करून पाण्याजवळ जाणे, पोहण्यासाठी उतरणे किंवा धोकादायक ठिकाणी छायाचित्रण करणे टाळण्याची गरज आहे.
दरम्यान, ताज्या दुर्घटनेनंतर गंगापूर धरण परिसरातील सुरक्षा उपाययोजनांचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पर्यटनाला चालना देतानाच नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा दरवर्षी अशाच दुर्घटना घडत राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणीच जलसंपदा विभागाचा 'सावधगिरी बाळगावी असा बोर्ड लावलेला आहे. नागरिकांनी पर्यटनाचा आनंद जरूर घ्यावा; मात्र अनुचित प्रकार आपल्या व इतरांसोबत घडणार नाही याची काळजीही घ्यावी.सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग