Ratnagiri News : चिपळूण तालुक्‍यातील १७ संभाव्य दरडग्रस्त गावांवर प्रशासनाची नजर

आपत्कालीन यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर; स्‍वतंत्र नोडल अधिकारी व पथक नियुक्‍त
 landslide
landslideFile Photo
Published on
Updated on

चिपळूण : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून चिपळूण तालुक्यातील 17 संभाव्य दरडग्रस्त गावे जाहीर केली आहेत. आपत्कालीन यंत्रणेच्या माध्यमातून17 ठिक़ाणी प्रशासनाची कायम दक्षता असणार आहे.

दरवर्षी डोंगर भाग असलेल्या या तालुक्याला पावसाचा तडाखा बसतो. अनुभव लक्षात घेता काही वर्षात आपत्कालीन यंत्रणा पावसाळ्यापूर्वीच सज्ज करण्यात येते. याअनुषंगाने या 17 ठिकाणी नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून जनजागृती पथके व नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. आपत्तीच्या कालावधीमध्ये जिवीतहानी होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने ही तयारी केली आहे. तालुक्यातील 17 संभाव्य दरडग्रस्त गावांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी व पथक नेमण्यात आले आहे.

उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 13 मे रोजी विभागीय वन अधिकारी कार्यालयाच्या आवारात मान्सूनपूर्व तयारी व पुनर्वसन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील पेढे, परशुराम, परशुराम घाट, तिवरे, रिक्टोली, तिवडी, नांदिवसे, कादवड, ओवळी, कळकवणे, पिंपळी, कोळकेवाडी, कुंभार्ली, पेढांबे, येगाव, कळंबट, गोवळकोट व पाचाड या गावातील वाड्यांचा संभाव्य दरडग्रस्त क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे.

या भागामध्ये मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन हा भाग दरडग्रस्त म्हणून घोषीत करण्यात आला आहे व महसूल प्रशासनाने येथे राहाणार्‍या ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय अशा धोकादायक ठिकाणी महसूल, पोलिस, आरोग्य, ग्रामपंचायत आणि इतर विभागांना समन्वय ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचप्रमाणे तालुक्यात बंद पडलेल्या व सोडून गेलेल्या चिरे व दगड खाणी, नद्यांचे डोह, तलाव, धबधबे या पाण्याच्या भागांपासून नागरिक व पर्यटकांनी दूर रहावे, याबाबत संबंधित ग्रामपंचायतीने जनजागृती करावी, तालुक्यातील व शहरातील धोकादायक फलक, होर्डिंग्ज काढून टाकावेत, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मृद व जलसंधारण तसेच जलसंपदा विभागाच्या धरण परिसरात धोका निर्माण होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news