Nashik robbery gang arrested for threatening with sickles
घोटी : घोटी-सिन्नर महामार्गावर देवळे गावाच्या पुढे रस्त्यावर अडवून कोयत्याचा धाक दाखवत दोघांना मारहाण व शिवीगाळ करून रोख रक्कम व मोबाइलची लूट करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. चार महिन्यांपूर्वी झालेल्या या रोडरॉबरी घटनेची उकल झाली असून, घोटीतील पाच संशयितांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
भंगार व्यापारी कलीममुल्ला अन्सार उल्ला चौधरी (रा. अंबड, नाशिक) यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याला चार महिन्यांपूर्वी घोटी-सिन्नर महामार्गावरील देवळे पेट्रोलपंपासमोर रस्त्यावर अडवले होते. चार ते पाच युवकांनी कोयत्याचा धाक दाखवत कोयत्याने व दगडाने मारहाण करून शिवीगाळ करीत दोघांच्याही खिशातून २२ हजार रुपये रोख व दोघांचे मोबाइल असा बावीस हजारांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेऊन पसार झाले होते.
याबाबतचा गुन्हा घोटी पोलिस ठाण्यात दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेने याबाबतचा समांतर तपास सुरू करून गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याची उकल केली. संशयित घोटी परिसरातील असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक डी. एस स्वामी, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलिस हवालदार प्रवीण काकड, संदीप नागपुरे, संतोष दोंदे, नवनाथ शिरोळे या पथकाने ही कारवाई केली.
अटक केलेले संशयित
पोलिसांनी अटक केलेले इम्रान अब्दुल हकीम शेख, गौरव निवृत्ती भोर, अमर बालाजी धावरे, साहिल हरिश्चंद्र तुपे, व युनूस खान (सर्व रा. घोटी, ता. इगतपुरी) अशी नावे आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल
आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले २ मोटरसायकल, ४ मोबाइल, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, कोयता, रोख रक्कम हस्तगत केले आहे.