नाशिक : वृत्तसेवा
शकारी सेवा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.६) नाशिकमध्ये विविध विभागांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील मानव-बिबट संघर्ष, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वन पर्यटन विकास, वृक्षलागवड मोहीम आणि वनविभागाच्या आधुनिकीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले.
बैठकीत नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत असलेल्या मानव-बिबट संघर्षाच्या घटनांवर चर्चा करण्यात आली. बिबट सफारी पार्क, रेस्क्यू सेंटर, वन्यप्राणी उपचार केंद्र तसेच बचाव पथकांचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांच्या सुरक्षेसह वन्यजीव संवर्धनाला प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला.
कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांचा विकास करत निसर्ग पर्यटनाला चालना देण्याचेही निर्देश बैठकीत देण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागामार्फत बेल, रुद्राक्ष, वड आणि पिंपळ यांसारख्या धार्मिक व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड सूचना करण्याबाबत केल्या.
शासनाच्या २०४७पर्यंत ३०० कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक प्रस्ताव आणि कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय पोलिस विभागाच्या धर्तीवर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य योजना राबवणे, वनविभागाचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अद्ययावतीकरण करणे आणि वन पर्यटन योजनांना अधिक बळकटी देण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीस मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, वनसंरक्षक गजेंद्र हिरे, उपवनसंरक्षक राकेश सेपट, सिद्धेश सावर्डेकर, धर्मवीर सालविठ्ठल, कृष्णा भवर, प्रादेशिक व्यवस्थापक उमेश वावरे, उपवनसंरक्षक विद्यासागरी आर. यू., विभागीय वन अधिकारी गणेश रणदिवे, डॉ. सुजित नेवसे, डॉ. अजित साजणे आणि प्रज्योत पालवे उपस्थित होते.