नाशिक : महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतही जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना (उबाठा) व मनसेत झालेली युती, काँग्रेसने केलेल्या अवास्तव जागांची मागणी, जुन्या नाशिकमधील जागांवरुन आघाडीत तिढा निर्माण झाल्याचे समोर आले. सन्मानजनक जागा वाटप करत इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे. आघाडी न झाल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीची नैसर्गिक आघाडी करण्याचा निर्णय बुधवारी (दि.२४) झाला. दरम्यान, आघाडीच्या जागा वाटपाबाबत गुरुवारी (दि. २५) पुन्हा बैठक होणार आहे.
राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) माजी आमदार सुनील भुसारा यांनी बुधवारी पक्ष कार्यालयात आघाडीतील घटक पक्षांची बैठक घेतली. बैठकीस काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, लक्ष्मण मंडाले, मुन्ना अन्सारी, गौरव सोनार, संतोष ठाकूर उपस्थित होते. भाजप-शिवसेनेच्या युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून इंडिया आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी उबाठा, मनसे समवेत बोलणी सुरू आहे.
मात्र, जुन्या नाशिकमधील प्रभागात उबाठा, मनसेने दावा केल्याने पेच निर्माण झाला आहे. उबाठा व मनसेची युती झाल्याने पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहे. त्याचा परिणाम आघाडीच्या जागा वाटपावर झाला आहे. शिवसेना यात 'मोठा भाऊ' होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसमोर ४० जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. मनसेला सोबत घेतल्यास राष्ट्रवादीच्या जागांवर दावा निर्माण होत असल्याने तिढा सुटलेला नाही. यावर तोडग्यासाठी काँग्रेसला ‘मोठा भाऊ’ ठरवून राष्ट्रवादी काँग्रेस जागा वाटप तिढा सोडवण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी उबाठा, मनसे, वंचित बहुजन आघाडीस सोबत घेत ‘इंडिया’ आघाडीच्या प्रयोगाचे प्रयत्न आहे. त्याला यश मिळाले नाही तर काँग्रेस व राष्ट्रवादीने निश्चित केलेल्या जागांनुसार निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
पुण्याच्या धर्तीवर नाशकात राष्ट्रवादी एकत्र
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला अद्याप सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या धर्तीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस नाशकात एकत्र येऊ शकतात. नाशिकमधे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आमच्या सोबत आल्यास त्यांना सन्मानाचे स्थान देऊ, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी सांगितले. पुण्यात झालेला प्रयोग नाशिकमधेही होऊ शकतो. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्यास हरकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सकारात्मक सुरू आहे. सन्मानजनक जागा वाटप करण्याचा प्रयत्न आहे. गुरुवारी पुन्हा बैठक असून यात अंतिम जागा वाटप होईल.सुनील भुसारा, निरीक्षक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
काँग्रेसकडून अवास्तव जागांची मागणी
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उबाठा सेना व मनसेच्या युतीत जागा वाटप निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. यात उबाठा शिवसेनेतून शरद पवार गट व काँग्रेसला जागा सो़डल्या जाणार आहेत. मनसे इतर लहान घटक पक्षांना जागा सोडणार आहे. यात काँग्रेसने अवास्तव जागांची मागणी केल्याने पेच तयार झाला आहे. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.