नाशिक : अतिवृष्टी व महापुराने जिल्ह्यातील तीन हजार गावांमधील सव्वा चार लाख शेतकऱ्यांच्या तब्बल तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील सुमारे 328.67 कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोरडवाहू पिकाखालील क्षेत्राचे सर्वाधिक हानी झाली आहे. पंचनामे अंतिम झाल्याने जिल्हा कृषी विभागाने नुकसानाची अहवाल अंतिम करत शासनाला सादर केला आहे.
या अहवालानुसार, कोरडवाहू पिकाखालील दोन लाख 34 हजार 116 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यात 1 हजार 527 इतके गावे असून यातील 3 लाख 30 हजार 88 बाधीत शेतकरी आहेत. 33 हजार 587 हेक्टर बागायती पिकाखालील क्षेत्र असून यात 843 बाधीत गावे आहेत. यामधील 54 हजार 559 शेतकरी बाधीत झाले आहे. 32 हजार 103 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांची हानी झाली आहे. 632 गावामधील 42 हजार 933 शेतकरी बाधीत झाले आहे. जिल्ह्यात एकूण 328.67 कोटींचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे कांदा, द्राक्षबाग, फुलशेती तसेच भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या भागांत विक्रमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर, शासनाच्या आदेशाप्रमाणे नुकसानाची पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. त्यासाठी कृषी अधिकार्यांसह स्थानिक तलाठी आणि कार्यालयीन कर्मचारी यांना कामाला लावले होते.198 मंडळात पावसाने धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान केले होते. जिल्हयातील नुकसानाची पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्यात आलेले असताना, शासनाने हेक्टर क्षेत्र वाढविल्याने पंचनाम्याच्या आकडेवारीत पुन्हा बदल झाला. एकूण नुकसानाचा झालेला अहवाल अंतिम करत जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल शासनाला सादर झाला आहे.