नाशिक/पंचवटी : गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने सोमवारी (दि.५) धरणाच्या विसर्गात दोन हजार क्यूसेकपर्यंत घट करण्यात आली. त्यामुळे गोदावरी नदीचा पूर ओसरला आहे. गोदाकाठावरील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
नाशिकमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे रविवारी (दि.४) दुपारी १२ वाजता प्रथमत: ५०० क्यूसेक वेगाने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. टप्प्याटप्प्याने वाढ करत विसर्ग ८ हजार १०० क्यूसेकवर नेण्यात आल्याने यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गोदावरीला पूर आला. परिणामी काठावरील जनजीवन विस्कळीत झाले. पूरपरिस्थिती लक्षात घेत पोलिस व महापालिका प्रशासनाने काठावरील रहिवासी, व्यावसायिक, टपरीधारक, हातगाडीधारकांना सुरक्षितस्थळी हलविले. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच गोदावरी दुथडी वाहू लागल्याने नाशिककरांनी पूर पाहण्यासाठी काठावर गर्दी केली.
अवघ्या जिल्ह्यात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने उसंत घेतली आहे. त्र्यंबकेश्वर तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे धरणातून सुरू असलेला विसर्ग टप्प्याटप्प्याने घटविण्यात आला. सध्या धरणातून दोन हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदाघाटावर पूरपरिस्थिती निवळण्यास मदत झाल्याने काठावरील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गोदावरीच्या पुरानंतर आता नदीच्या दोन्ही काठांवर गाळ साचला आहे. महापालिका प्रशासनातर्फे हा गाळ उपसण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२) मध्यरात्रीपासून पावसाने मुक्काम ठाेकला. धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. गंगापूर, दारणा, पालखेड, चणकापूरसह विविध धरणांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला. हे एकत्रित पाणी नांदूरमध्यमेश्वरद्वारे जायकवाडीत पोहोचले आहे. तीन दिवसांत जिल्ह्यातील धरणांमधून सुमारे तीन टीएमसी पाणी जायकवाडीत पाेहोचले. तर यंदाच्या हंगामात आतापर्यंत एकूण १० हजार ४६७ दलघफू म्हणजेच १०.५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. नाशिक व नगरमधील धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे जायकवाडीचा साठा १३ टक्क्यांवर पाेहोचला आहे.