नाशिक : दिवाळी आणि सणासुदीत अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत १६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या २२ दिवसांच्या कालावधीत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये धडक कारवाया करण्यात आल्या. यात तब्बल १२० अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, तीन कोटी ७८ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा दोन लाख २७ हजार किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत नाशिक जिल्हा आघाडीवर असून, जिल्ह्यातील ६५ आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली 'सण-उत्सव विशेष मोहीम २०२६' राबविण्यात येत आहे. विभागातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये मिठाई दुकाने, खाद्यतेल विक्रेते, मसाले उत्पादक, फरसाण व्यावसायिक तसेच अन्य अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासण्यांमध्ये अन्नसुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
जिल्हानिहाय कारवाईचा विचार करता नाशिकमध्ये सर्वाधिक ६५, जळगावमध्ये २३, धुळ्यात १३, अहिल्यानगरमध्ये १०, तर नंदुरबारमध्ये नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान मिठाई, चिवडा, खाद्यतेल, मसाले, फरसाण, खोया, बटर, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, खवा, मावा आणि भगर अशा विविध अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यात मसाले, खाद्यतेल, मिठाई आणि फरसाण यांचे प्रमाण लक्षणीय आहे. दरम्यान, अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या निकषांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
अस्वच्छ उत्पादन, भेसळीचा संशय अन् चुकीचे लेबलिंग नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी तपासणी आणि कारवाईची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
खाद्यतेल, मिठाईमध्ये भेसळ
खाद्यतेलाच्या रिपॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या डब्यांचा पुन्हा वापर केला जात असल्याचे आढळले. तेलाच्या पॅकिंगवरील माहितीमध्येही नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. काही खाद्यतेलाच्या पॅकिंगवर 'फोर्टिफाइड ऑइल' असा दावा करण्यात आला होता; मात्र त्यासाठी आवश्यक असलेला वैध परवाना संबंधित व्यावसायिकांकडे उपलब्ध नव्हता. मिठाईमध्ये विहित मर्यादपेक्षा अधिक प्रमाणात खाद्यरंगाचा वापर करण्यात आल्याचेही तपासणीत समोर आले. ऐन दिवाळीत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे भेसळखोरीला काही प्रमाणात का होईना लगाम बसला आहे.
तपासणीदरम्यान काही अन्नपदार्थ विहित गुणवत्ता मानकांनुसार नसल्याचा संशय आढळून आला. अनेक ठिकाणी उत्पादन आणि साठवणूक अस्वच्छ तसेच अयोग्य परिस्थितीत केली जात असल्याचे निदर्शनास आले. काही उत्पादकांकडून लेबलिंग नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने बँडिंग केले जात असल्याचेही उघड झाले.