FDA  (File Photo)
नाशिक

FDA Raid Energy Drinks | एनर्जी ड्रिंक्स, पनीर, तेलाचा साठा जप्त

FDA Raid Energy Drinks | अन्न औषध प्रशासनाची कारवाई : १ लाखांचे खाद्यपदार्थ ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाढत्या उन्हाळ्यामुळे एनर्जी ड्रिंक्स आणि थंड पेयांची मागणी वाढत असल्याने, नफेखोर भेसळयुक्त पदार्थ बाजारात आणून ग्राहकांच्या जिवाशी खेळत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी कारवाई करीत तब्बल १ लाख ११ हजार ७९२ रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला.

विनापरवाना व्यवसाय, भेसळयुक्त पदार्थांची विक्री आणि अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थांची निर्मिती होत असल्याचे या कारवाईत उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी (दि. २७) विविध भागांत तपासणी मोहीम राबविली. त्यामध्ये अनेक दुकाने आणि उत्पादन केंद्रांवर छापे टाकून अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

जेल रोड, नाशिकरोड येथील मे. अजनी ट्रेडर्स या दुकानाची तपासणी केली असता, संबंधित व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या कॅफिनेटेड बेव्हरेजेस (स्टिंग) आणि इतर एनर्जी ड्रिंक्सचे नमुने घेण्यात आले. तसेच सुमारे ३९ हजार ६८० रुपयांच्या १ हजार ५८४ बाटल्या जप्त करण्यात आल्या. यासह जिल्ह्यातील इतर भागांत कारवाई करीत अन्नपदार्थ ताब्यात घेण्यात आले.

अन्नपदार्थांचे सर्व नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, संकेत येळमामे, गोविंदा गायकवाड, प्रतीक भड, सुहास मंडलिक, संदीप तोरणे आदींच्या पथकाने केली. दरम्यान, भेसळयुक्त किंवा संशयास्पद अन्नपदार्थांविषयी माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ अन्न व औषध प्रशासनाला संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

थंड पेयांचाही साठा

जप्त सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे मे. स्वामी बेव्हरेजेस या दकानात स्वीटनड कार्बोनेटेड बेव्हरेजेसचे नमुने घेण्यात आले. येथे २ हजार ४०० रुपये किमतीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या

पापड स्नॅक्समध्ये भेसळीचा संशय

पंचवटीतील मार्केट यार्ड येथील मे. नेहा फूड प्रॉडक्ट्स या ठिकाणीही तपासणी करण्यात आली. येथे मैदा पापड, स्नॅक्स या पदार्थांचे नमुने घेण्यात आले. भेसळीचा संशय आल्याने १३ हजार ६८५ रुपये किमतीचा ३३६ किलो साठा जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला.

अस्वच्छ ठिकाणी पनीर उत्पादन

इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथे मे. गुरुदत्त छाया डेअरी होम येथे अस्वच्छ ठिकाणी पनीर उत्पादन आणि विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाने पनीरचे नमुने घेत ३ हजार २०० रुपये किमतीचा १० किलो साठा नष्ट केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT