Vegetable Export Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Agriculture Export Crisis | नाशिकच्या कांदा-द्राक्षाला युद्धाची झळ! 1500 कंटेनर जेएनपीटीवर अडकले; खासदारांची केंद्र सरकारकडे धाव

Nashik Agriculture Export Crisis | तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावात कोट्यवधींचा माल जेएनपीटी बंदरात अडकून पडल्यामुळे संकटात सापडलेल्या कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी खासदार राजाभाऊ वाजे व खासदार भास्कर भगरे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे धाव घेतली आहे.

त्यांनी पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र मंत्रालय तसेच लोकसभेच्या परराष्ट्र व्यवहार समितीला ई-मेल तसेच पत्राद्वारे सविस्तर निवेदन सादर करत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आखाती देशातील जवळपास १४ देशांमध्ये हा संघर्ष सुरू आहे.

आखाती देशात किमान एक कोटीहून अधिक भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. रोजगार, व्यवसाय आणि इतर कारणांमुळे नाशिक जिल्ह्यातीलही मोठी संख्या या देशांमध्ये कार्यरत आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेबाबत त्यांच्या कुटुंबीयांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे वाजे व भगरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. यासह या संघर्षाचा संभाव्य परिणाम कृषी निर्यातीवर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

द्राक्ष, कांदा, डाळिंब, पपई, मनुका यांसारख्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी नाशिक हे देशातील महत्त्वाचे केंद्र मानले जाते. दर महिन्याला हजारो टन नाशवंत शेतमाल आखाती देशांकडे निर्यात होतो. मात्र, सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे समुद्री मार्गांत अडथळे निर्माण होत असल्याने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टवर मोठ्या प्रमाणात कृषी माल अडकून पडला आहे.

आवश्यकतेनुसार तातडीच्या सूचना व हेल्पलाइन सुरू करणे, परिस्थिती बिघडल्यास नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराची पूर्वतयारी ठेवणे तसेच कृषी निर्यात सुरळीत राहावी यासाठी शिपिंग व बंदर प्राधिकरणांशी समन्वय साधून शेतकरी व निर्यातदारांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना राबवण्याची मागणी खासदार वाजे व खासदार भगरे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे.

जेएनपीटीवर नाशिकचे २०० कंटेनर

दुबईच्या दिशेने जाणारे सुमारे १,५०० कंटेनर जेएनपीटी बंदरात अडकले आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष, पपई या मालाचे १५० ते २०० हून अधिक कंटेनर आहेत. हा माल नाशवंत असून, वेळेत पोहोचला नाही तर खराब होण्याची भीती आहे. त्यातून शेतकरी व निर्यातदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

आखाती देशात अडकलेले नागरिक, विद्यार्थी, कामगार यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. शेतकरी व निर्यातदारांवरदेखील मोठे संकट ओढवले आहे. त्याबाबत सरकारने मार्ग काढावा, अशी अपेक्षा आहे.
- राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
ताज्या फळ-भाज्यांच्या हवाई वाहतुकीसाठी अनुदान, वैकल्पिक समुद्री मार्गांचा वापर सुनिश्चित करा, महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्था स्थिर राहील व शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित ठेवता येईल, असे धोरण लवकरात लवकर ठरवा.
- भास्कर भगरे, खासदार, दिंडोरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT