नाशिक : गत आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने ४८ हजार ३२४ हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. pudhari news network
नाशिक

Nashik Farmers Crisis : अवकाळीचा जिल्ह्यात 48 हजार हेक्टरला तडाखा

मका, कांद्याला सर्वाधिक फटका; सटाणा, देवळा तालुक्यांत सर्वाधिक नुकसान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गत आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने ४८ हजार ३२४ हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मका, सोयाबीन, भात, कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे ९०१ गावांमधील १ लाख ८ हजार ५३१ शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका सटाणा तालुक्यातील १६ हजार १४९ हेक्टर, तर देवळा तालुक्यातील १४ हजार ७० हेक्टरला बसला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने यंत्रणांना पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत.

सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी, महापुराने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदत वर्ग झालेली नसताना पुन्हा एकदा जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून राज्यासह नाशिक जिल्ह्यात पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला मोठा तडाखा दिला आहे. यात गत दोन दिवसांत झालेल्या अवकाळीने पिके ही नेस्तनाबूत झाली आहेत.

जिल्ह्यामध्ये १९ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत हजेरी लावलेल्या पावसामुळे ९०१ गावांमधील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका मका पिकाला बसला आहे. तब्बल १८ हजार ५५८ हेक्टरवरील मका पीक पाण्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पाठोपाठ १२ हजार ७९३ हेक्टर कांदा तसेच १ हजार १०३ हेक्टरवरील कांदा रोपवाटिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय ११ हजार ७९७ हेक्टरवरील भातपीक, १ हजार ६४२ हेक्टरवरील मका, १ हजार ३२३ हेक्टरवरील द्राक्षपिकांची हानी झाली आहे. बाजरी, भाजीपाला, टोमॅटो, डाळिंबास अवकाळीचा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासन बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करत आहे. त्यासाठी कृषी विभागाचे सहकार्य घेतले जात आहे. परंतु, सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यातही अनेक ठिकाणी शेतांत पाणी साचून राहिले असल्याने पंचनामे करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे अंतिमत: पंचनाम्यांमध्ये नुकसानीची आकडे वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवकाळीमुळे प्राथमिक नुकसान

  • बाधित गावे : ९०१

  • बाधित शेतकरी : १०८५३१

  • जिरायत क्षेत्र : ३२०५८ हेक्टर

  • बागायत क्षेत्र :१४६४४ हेक्टर

  • बहुवार्षिक फळपीक : १६२३ हेक्टर

पीकनिहाय नुकसान असे...

  • मका - १८ हजार ५५८ हेक्टर

  • सोयाबीन - १ हजार ६४२ हेक्टर

  • भात - ११ हजार ७९६ हेक्टर

  • भाजीपाला - ५१ हेक्टर

  • कांदा - १२ हजार ७९३ हेक्टर

  • कांदा रोपवाटिका - १ हजार ३०३ हेक्टर

  • बाजरी - २५९ हेक्टर

  • टोमॅटो - १०४ हेक्टर

  • द्राक्ष - १ हजार ३२२ हेक्टर

  • डाळिंब - २८९ हेक्टर

तालुकानिहाय नुकसान (हेक्टरनुसार)

  • सटाणा - १६ हजार १४९

  • कळवण - ५ हजार २०

  • देवळा - १४ हजार ७०

  • दिंडोरी - ८६.५०

  • सुरगाणा - ४ हजार ९२३

  • नाशिक - ६.३०

  • त्र्यंबकेश्वर - १ हजार ३९०

  • पेठ - ३ हजार २१९

  • इगतपुरी - २ हजार १४८

  • निफाड - २७

  • सिन्नर - १४१

  • चांदवड - १ हजार १४१

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT