निफाड (नाशिक) : तालुक्यातील उगाव येथील प्रगतिशील शेतकरी कैलास यादवराव पानगव्हाणे (44) यांनी द्राक्षबागेतील बिकट परिस्थितीमुळे सोमवार (दि. ३) सकाळी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली.
पानगव्हाणे सकाळी 8 च्या सुमारास आपल्या द्राक्षबागेत फेरफटका मारण्यासाठी गेले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेची अत्यंत वाईट अवस्था पाहून ते मानसिकरीत्या खचले. बागेची बिकट अवस्था पाहून ते घरी परतल्यानंतर त्यांनी विषारी औषध प्राशन केले. काही क्षणातच ते घरातील खाटेवर बेशुद्ध पडल्याने व तोंडातून फेस येऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ त्यांना निफाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मृताचे पुतणे शुभम विलास पानगव्हाणे यांनी निफाड पोलिसांत खबर दिली. निफाड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पोलिस निरीक्षक गणेश गुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. कैलास पानगव्हाणे यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. दुपारी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि द्राक्षबागांची बिकट परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात समोर आली आहे.
या घटनेनंतर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत वैफल्यग्रस्त न होता टोकाचे पाऊल उचलू नये. शासनाच्या अनेक योजना त्यांच्या मदतीसाठी आहेत. प्रशासन तुमच्या पाठीशी उभे आहे. कुठलीही अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा. आम्ही या कुटुंबाला शासकीय नियमानुसार तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.