Misal Pav Pudhari
नाशिक

Nashik Misal Price Hike | महागाईत तरीदार मिसळीला 'ती'चा हातभार

Nashik Misal Price Hike | गृहिणींच्या हातची चव अन् पारंपरिक मिसळीचा तोरा कायम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक:

नाशिक म्हटले की सर्वप्रथम आठवते ती तरीदार मिसळ! मात्र, इतर खाद्यपदार्थांसह सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील सर्वच वस्तूंचे दर वाढल्यामुळे महागाईचा फटका मिसळीलादेखील बसला असून, नाशिककरांच्या आवडत्या मिसळीची 'तरी' जरा जास्तच तिखट झाली आहे. या कसरतीमध्येही आपले कसब दाखवून शहरातील तरीदार मिसळीला गृहिणींचा हातभार मिळाल्याने नाशिकच्या या मिसळीचा गाडा तोऱ्यात सुरू आहे.

मिसळ हा नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सकाळचा नाश्ता असो किंवा वीकेंडला रविवारी कुटुंबासोबतची मेजवानी, मिसळला कायम पसंती असते. परंतु, नाशिकची ओळख असलेल्या तरीदार मिसळीवरही महागाईचे सावट आले आहे.

परिणामी, मिसळीच्या दरात वाढ करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली असली, तरी चव आणि दर्जात तडजोड न करता, व्यवसाय सुरू ठेवत, घरगुती चवीची मिसळ तयार करण्यासाठी अनेक गृहिणी पुढे सरसावल्या असून, त्यांनी घरगुती मिसळ विक्रीचा व्यवसाय वर्षानूवर्षांपासून सुरू ठेवलेला आहे.

त्यामुळे शहरातील मिसळप्रेमींसाठी पारंपरिक चवीचे नवे पर्याय उपलब्ध झाले असले, तरी गावातील ५० वर्षे जुनी मिसळदेखील अजूनही कायम पसंती मिळवत आहे. मिसळशिवाय इतरही खाद्यपदार्थांना महागाईचा फटका बसला आहे. हॉटेलमधील नाश्ता, जेवण आणि इतर खाद्यपदार्थही महागले आहेत.

महागाईचा फटका: पूर्वीचे दर आणि आताचे दर

वाढत्या महागाईमुळे मिसळ आणि तिच्याशी संबंधित इंधन व इतर खाद्यपदार्थांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे:

  • मिसळ: पूर्वी ₹८० असणारा दर आता ₹१२० झाला आहे.

  • वडापाव: ₹१८ वरून ₹२० झाला आहे.

  • भजी: ₹२५ वरून ₹३० ते ₹३५ झाली आहे.

  • समोसा व सँडविच: प्रत्येकी ₹१८ वरून ₹२० झाले आहेत.

  • घरगुती गॅस सिलेंडर: ₹८५० वरून ₹९४५ वर पोहोचला आहे.

  • पेट्रोल: ₹१०४ वरून ₹११२ प्रति लिटर झाले आहे.

  • व्यावसायिक गॅस: ₹१,८०० वरून थेट ₹३,००० झाला आहे.

५० वर्षांपासून 'जावा-जावांची' अस्सल मठाची मिसळ

जुल्या नाशिकमधील बागवानपुरा येथील ज्योती संजय शिंदे आणि दीपिका नागेश शिंदे या जावा-जावांनी गेल्या ५० वर्षांपासून मिसळीची परंपरा जपली आहे. आजोबांच्या काळात ५० पैसे प्लेटपासून सुरू झालेल्या या व्यवसायाला आता चांगली लोकप्रियता मिळाली असून, ६० रुपये प्लेट दराने दररोज सुमारे ५०० प्लेट मिसळीची विक्री होते.

घरगुती मसाल्यांचा वापर करून तयार केलेली अस्सल मठाची मिसळ खवय्यांच्या पसंतीस उतरलेली आहे. कुटुंबाच्या सहकार्याने ज्योती आणि दीपिका यांनी व्यवसायाचा विस्तार करीत नाशिकच्या मिसळ संस्कृतीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

एक आण्यापासून सुरू झालेली 'सीताबाईंची मिसळ'

सुमारे ९० वर्षांची खाद्यपरंपरा असलेली 'सीताबाईची मिसळ' नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग झाली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जुन्या नाशिकमधील बुधवार पेठेतील सुभाष सार्वजनिक वाचनालय परिसरात सीताबाई दगडूशेठ मोरे यांनी छोट्याखानी स्वरूपात मिसळीची सुरुवात केली.

पुढे चव्हाटा परिसरात स्थलांतरित झालेली या मिसळीला ६७ वर्षे पूर्ण झाली आहेत. चुलीवर तयार होणारी नाशिकची पहिली मिसळ म्हणून 'सीताबाईंची मिसळ'ला विशेष ओळख आहे. एक आण्यापासून सुरू झालेल्या मिसळीचा दर आज ७० रुपये असून, दररोज ५०० हून अधिक प्लेटची विक्री होते. सीताबाईंचे नातू रोहित संजय मोरे सध्या हा खाद्यवारसा पुढे नेत आहेत.

सासू-सुनेची तरीदार मिसळ ('साक्षी मिसळ')

सारडा सर्कल परिसरातील 'साक्षी मिसळ'ने खवय्यांच्या पसंतीस उतरून चांगली लोकप्रियता मिळवली आहे. विशेष म्हणजे सासू कलावती मिकाजी शिंदे आणि सून अश्विनी भारत शिंदे या सासू-सुनेच्या जोडीने मिसळीला खास तरीदार रंगात आणले आहे.

त्यांच्या मिसळ व्यवसायाने आज रौप्यमहोत्सवी (२५ व्या) वर्षात पदार्पण केले आहे. ७० रुपये प्लेट दराने दररोज ३५० ते ४०० प्लेट मिसळीची विक्री होत आहे. खवय्यांच्या मागणीनुसार मिसळीचे पार्सलही उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे साक्षी मिसळीची चव नाशिककरांच्या जिभेवर चांगलीच रेंगाळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT