FDA Action Pudhari
नाशिक

Nashik FDA Action | नाशिकमधील प्रसिद्ध मिसळ हॉटेल्सना FDA चा दणका! चार हॉटेल्सचे परवाने निलंबित

Nashik FDA Action | झणझणीत मिसळसाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरातील प्रसिद्ध चार मिसळ हॉटेल्सना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दणका दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

झणझणीत मिसळसाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरातील प्रसिद्ध चार मिसळ हॉटेल्सना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दणका दिला आहे. विहार, श्यामसुंदर यांच्यासह अन्य दोन मिसळ हॉटेल्सवर अस्वच्छतेचा ठपका ठेवत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत. याशिवाय एका कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्रही रद्द केले आहे. गुरुवारी (दि. १९) केलेल्या या कारवाईमुळे शहरातील खाद्य व्यावसायिकांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.

मागील काही दिवसांपासून अन्न प्रशासनाकडून शहरात धडक कारवाईची मोहीम राबविली जात असून, अनेक आस्थापनांची तपासणी करीत परवाना निलंबनाची कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच साबुदाणा वड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भद्रकाली मार्केटमधील 'सायंतारा' आस्थापनेवर परवाना निलंबनाची कारवाई केली होती.

आता प्रसिद्ध मिसळसाठी ओळखल्या जाणाऱ्या जुना गंगापूर नाका परिसरातील वूडलँड टॉवर येथील 'विहार', सातपूर एमआयडीसीतील 'श्यामसुंदर', कॉलेजरोड परिसरातील 'हॉटेल तुषार मिसळ' आणि पंचवटीतील आडगाव फाटा येथील 'महाराजा काठियावाडी' या आस्थापनांवर कारवाई केली आहे.

याशिवाय कृषिनगर येथील क्यूबॉइड बिझनेस सेंटरमधील 'कॅफे दुर्गा' या आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे. ही कारवाई अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने, सहायक आयुक्त विनोद धवड, ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील, ऋतुजा नवले, प्रतीक भड, किशोर चांदगुडे, संकेत येलमामे यांनी केली.

अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य यांना सर्वोच्च प्राधान्य असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

तपासणीमध्ये काय आढळले?

  • तपासणीदरम्यान विहार आणि श्यामसुंदर या आस्थापनांमध्ये अस्वच्छ परिस्थिती आढळली. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटक व इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले. श्यामसुंदर येथे कच्च्या अन्नमालाची अस्वच्छ पद्धतीने साठवणूक तसेच निर्धारित अटींचे उल्लंघनही आढळले.

  • कॅफे दुर्गा येथे स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलांवर भारतीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाचा (एफएसएसएआय) क्रमांक नसणे, तसेच डिस्प्ले क्षेत्रात खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाक माध्यमाचा उल्लेख नसल्याची त्रुटी आढळली.

  • 'हॉटेल तुषार मिसळ' या आस्थापनेत अन्नपदार्थ हाताळण्यासाठी अपुरी जागा आणि बाहेरील अन्नपदार्थ आढळले. तर महाराजा काठियावाडीच्या साठवणूक कक्षात उंदरांची विष्ठा आढळली. तसेच अस्वच्छ अन्नपदार्थ आणि अन्न तयार करण्याच्या ठिकाणी धूळ प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

नागरिकांनी थेट तक्रार करा!

अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व सुरक्षिततेबाबत नागरिकांना काही तक्रार किंवा शंका असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकृत तक्रार संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. तसेच सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि त्याअंतर्गत नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT