सिडको (नाशिक) : व्याजाच्या नावाखाली मोठी रक्कम वसूल करूनही पुन्हा खंडणी मागत दोन दुचाकी आणि दोन चारचाकी वाहने बळजबरीने पळवून नेल्याचा गंभीर प्रकार सिडको परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी विजय बाळासाहेब झणकर उर्फ भावड्या (रा. तोरणा नगर, सिडको) याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर देवरे (वय ३४, रा. फडोळ मळा, अंबड, नाशिक) यांनी २०२२ ते २०२३ या कालावधीत व्यवसायासाठी संशयित आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते. ही रक्कम त्यांनी व्याजासह परत केल्यानंतर, पुन्हा आर्थिक अडचणीमुळे दरमहा दहा टक्के व्याजदराने आरोपीकडून ७ लाख ६८ हजार ५०० रुपये घेतले.
या रकमेपोटी देवरे यांनी आरोपी झणकर याला व्याजासह एकूण १६ लाख ७६ हजार रुपये परत केले. मात्र एवढी रक्कम मिळूनही आरोपीने समाधान न मानता आणखी १५ लाख रुपयांची मागणी केली. दबाव टाकत त्याने फिर्यादी यांच्या सुमारे १८ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी व दोन चारचाकी वाहने बळजबरीने ताब्यात घेतली.
वाहने परत हवी असतील तर १५ लाख रुपये आणावेत, अशी धमकी देत आरोपीने फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून एटीएम सेंटरवर नेऊन पैसे काढण्यास भाग पाडले. फिर्यादीने पैसे काढण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांना गाडीतून ढकलून दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर पुढील तपास करीत आहेत.