

सिडको (नाशिक) : अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना खोट्या अतिक्रमणाच्या तक्रारी दाखल करून खंडणी उकळणाऱ्या कुख्यात खंडणीखोर संतोष शर्मा याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा आठवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव जोशी (रा. गंगापूर रोड, नाशिक) हे लघु उद्योजक असून अंबड औद्योगिक वसाहतीत त्यांची कंपनी आहे. संशयित आरोपी संतोष शर्मा याने त्यांच्या कंपनीतील कथित अनधिकृत बांधकामाबाबत एमआयडीसी कार्यालय, सातपूर येथे तक्रार दाखल केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी शर्माने फिर्यादीकडून चार लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
भीतीपोटी फिर्यादी जोशी यांनी सुरुवातीला दोन लाख रुपये दिले. मात्र एवढ्यावरच न थांबता आरोपी शर्माने जोशी यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांत शर्माने फिर्यादीकडून एकूण चार लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संतोष शर्मा याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यावर यापूर्वीही सात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हा आठवा खंडणीचा गुन्हा ठरला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड करीत आहेत.
दरम्यान, संतोष शर्मा याच्याविरोधात आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल किंवा खंडणीची मागणी करण्यात आली असेल, त्यांनी पुढे येऊन अंबड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन चुंचाळे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष नरूटे यांनी केले आहे.