नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकप्रमूख बदलल्याची आपल्या माहिती नाही, असे नमूद करत कोणी निवडणूक प्रमुख झाले म्हणून तेच उमेदवारी यादी अंतिम करतील असे होत नाही, अशी सारवासारव करत भाजपात निवडणुकीसाठी जितका अधिकार आ. देवयानी फरांदे यांना पक्षाने दिला आहे तितकाच आ. राहुल ढिकले यांना देखील असल्याचे स्पष्टीकरण कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. निवडणूकीत तीनही आमदारांना विश्वासात घेवून आणि उमेदवारांचे मेरीट बघूनच निर्णय घेतला जाईल असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजन यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. नाशिक महापालिका निवडणूकांच्या तोंडावर निवडणूक प्रमुख बदलाबाबत महाजन यांनी भाष्य करत, सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कोणाला प्रमुख केले म्हणजे तोच अंतिम निर्णय घेत असतो असे होत नाही असे सांगत, पक्षात सामूहिक निर्णय होत असल्याचा दावा महाजन यांनी केला. पक्षातील वरीष्ठ म्हणून देवयानी फंरादेकडे जबाबदारी देण्यात आली असेल. पक्षात एक व्यवस्था असते. यादी तयार करणे ती मुंबईला पाठवणे यासाठीची ही व्यवस्था असते, असे महाजन म्हणाले.
महायुतीचा नारा शंभर प्लस
पक्षाचे स्वबळाचा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाध्यक्षांना नसतो असे स्पष्टीकरण देत, शहराध्यक्ष सुनिल केदार यांच्या वक्तव्याचा महाजन यांनी समाचार घेतला. महायुतीच्या माध्यमातून निवडणूका लढणार असून त्यांसदर्भात चर्चा सुरू असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. शंभर प्लसचा नारा भाजपचा नव्हे तर महायुतीचा असल्याचे महाजन यांनी नमूद केले. महायुती असेल तर शंभर प्लस होणार आहे. आम्ही शंभर प्लस असे म्हटले आहे असे सांगत युतीचेही त्यांनी संकेत दिले आहेत.