नाशिक : पुढारी वृत्तसेवा
द्वारका चौकातील महापालिकेच्या मालकीच्या सुमारे चार एकर जागेवरील अतिक्रमणे हटविण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या सुनावणीवेळी कागदपत्रे सादर न केलेल्या तसेच अनुपस्थित राहिलेल्या ४० दुकानदारांची अंतिम सुनावणी गुरुवारी (दि. २६) घेण्यात आली.
अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्यासमोर संबंधित दुकानदारांनी वकिलांमार्फत आपली बाजू मांडली. आता या प्रकरणात महापालिका आयुक्त मनीषा खत्री अंतिम निर्णय घेणार आहेत. द्वारका चौकातील सर्व्हे क्रमांक ४८९ मधील फायनल प्लॉट क्रमांक २८२ ही सुमारे चार एकर जागा महापालिकेच्या मालकीची आहे.
सध्याच्या बाजारभावानुसार या जागेची किंमत सुमारे २०० कोटी रुपये आहे. नाशिक नगरपालिका अस्तित्वात असताना १९७३ पासून ही जागा भाडेतत्त्वावर दुकानदारांना देण्यात आली होती. सध्या येथे १०९ दुकानदार व्यवसाय करीत आहेत. रस्ता रुंदीकरणात अडथळा निर्माण होत असल्यामुळे महापालिकेने २०१५ मध्ये संबंधित दुकानदारांना नोटिसा बजाविल्या होत्या.
दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने संबंधित दुकाने अनधिकृत ठरवत १५ दिवसांत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतली होती.
जिल्हा न्यायालयाने दि. ५ जानेवारी २०२३ रोजी महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ४० दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने दुकानदारांच्या बाजूने निर्णय दिला होता.
या निर्णयाविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित जागेवरील महापालिकेचा ताबा कायम ठेवत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार नाशिक पूर्व विभागाने पहिल्या टप्प्यात ७६ दुकानदारांना नोटिसा बजावून ऑक्टोबरमध्ये सुनावणी घेतली होती. यावेळी ४० दुकानदारांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली होती. त्यानुसार गुरुवारी या दुकानदारांची सुनावणी आली.
सुनावणीदरम्यान ४० दुकानदारांनी वकिलांमार्फत आपले म्हणणे मांडले. मात्र, अनेक दुकानदारांकडे जागेवरील मालकी हक्क सिद्ध करणारी ठोस कागदपत्रे नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिका प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांना त्यांच्या हक्कासंदर्भातील उपलब्ध कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता आयुक्त मनीषा खत्री यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. त्यांच्या निर्णयानंतर द्वारका येथील कोट्यवधींच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याबाबत पुढील कार्यवाही निश्चित होणार आहे.