नाशिक

Nashik Drug Case : ड्रग्ज माफियाचे राजकीय कनेक्शन अंधारातच

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज माफिया ललित पानपाटील- पाटील हा रुग्णालयात राजकीय मदतीशिवाय एवढे महिने राहु शकत नाही, तो शिवसेनेचा सक्रिय कार्यकर्ता आहे, ललितला रुग्णालयात दाखल करण्यासाठी एका मंत्र्याने रुग्णालयाच्या डीनला फोन केला असे अनेक आरोप गेल्या १३ दिवसांत झाले. मात्र एकानेही त्यांच्याजवळ असलेले पुरावे जनतेसमोर किंवा पोलिसांना न दिल्याने या प्रकरणातील राजकीय कनेक्शन अद्याप अंधारातच दिसत आहे. (Nashik Drug Case)

पुणे येथील ससून रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली मुक्काम करीत ड्रग्ज पुरवणाऱ्या ललित पाटीलने २ ऑक्टोबरला रुग्णालयातून पळ काढला. त्यानंतर ललितच्या राजकीय प्रवेशापासून ते आजारपणामुळे रुग्णालयात मुक्काम कसा ठोकला याविषयी राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, कॉंग्रेसचे आ. नाना पटोले यांनी ललितशी आ. दादा भुसे यांचे संबंध असल्याचा आरोप केला. त्यास भुसे यांनीही पुरावे देण्याचे आवाहन करीत आरोप खोडण्याचा प्रयत्न केला. तर नाशिक शहरातही एकत्रित शिवसेनेतील विनायक पांडे, अजय बोरस्ते, बबन घोलप आदींवरही ललितसोबत संबंध असल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले. ललितचे राजकारण्यांशी घनिष्ठ संबंध कसे होते हे दर्शवणारे छायाचित्रेही समोर आली. मात्र आम्ही ते नव्हेच असे सांगून सर्वांनी मान सोडवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्ती राजकीय पायरी चढून लोकप्रतिनिधी बनून किंवा लोकप्रतिनिधींशी घनिष्ठ संबंध ठेवून गुन्हेगारी पार्श्वभूमी पुसण्याचा प्रयत्न करतो. याआधीही अनेक कुख्यात गुन्हेगार 'व्हाईट कॉलर' झाले असून त्यांना राजकीय आश्रय लाभला आहे. ललितच्या बाबतीही फक्त आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून कोणीही ठोस पुरावा दिलेला नाही. त्यामुळे त्याचे कोणत्या राजकीय व्यक्तींसोबत संबंध होते ही बाब उघड होईल का याबाबत अद्याप कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.

ललित हा उपचाराच्या बहाण्याने ससून रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र नऊ महिने कोणत्या आजारावर उपचार झाले ही बाब समोर आलेली नाही. त्यामुळे ललितला राजकीय, रुग्णालय, पोलिस, गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्तींची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होती हे उघड-उघड बोलले जात आहे. तसेच कोणत्याही मदतीविना एवढे दिवस लपून राहणे अशक्य असल्याने ललितला लपण्यास मदत कोण करत आहे याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT