नाशिक : नामदेव भोर
अतिवृष्टीपाठोपाठ आता दुष्काळाच्या संकटाने नाशिकच्या भाजीपाला उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. पावसातील दीर्घ खंडामुळे कांदा, टोमॅटो आणि अन्य बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १४ दुष्काळग्रस्त तालुक्यांत २८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील बागायती पिके बाधित झाली आहेत. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटणे, सिंचनासाठी वाढता खर्च आणि उत्पादनातील अनिश्चिततेमुळे भाजीपाला उत्पादनात मोठी घट होऊन ठाणे-मुंबईसह देशभरातील भाजीपाला पुरवठ्याची साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
नाशिकमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि गुजरातसह देशातील विविध बाजारपेठांना मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पुरविला जातो. त्यामुळे आगामी काळात उत्पादन आणि आवक घटल्यास या बाजारपेठांमधील पुरवठ्याचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. पर्यायी बाजारपेठांतून माल मागविण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आल्यास वाहतूक खर्च वाढून त्याचा भार ग्राहकांनाही सोसावा लागू शकतो.
नाशिक जिल्ह्यात २०२५ मध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अतिवृष्टीने सुमारे २ लाख ७९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले होते. त्यानंतर पावसाच्या दीर्घ खंडाने शेतीचे अर्थकारण कोलमडले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये भाजीपाला पिकांसह अन्य रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.
नाशिकमधून दररोज २५० टनांहून अधिक भाजीपाला देशभरातील विविध बाजारपेठांत पाठविला जातो. त्यातील सुमारे २५ टक्के पुरवठा मुंबई परिसराला होतो. सध्याच्या दुष्काळामुळे त्यातील परिणाम दिसत नसला तरी उत्पादनातील घट कायम राहिल्यास मुंबईच्या वाशी एपीएमसीसह गुजरातधील बाजारपेठांनाही पर्यायी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागू शकते. त्यामुळे नाशिकचा दुष्काळ केवळ शेतकऱ्यांचा प्रश्न न राहता राज्याच्या भाजीपाला पुरवठा साखळीपुढील आव्हान बनण्याची भीती व्यक्त होत आहे.
कांद्याला सर्वाधिक फटका
जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक २१ हजार ७७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. टोमॅटोचे १ हजार ७२७ हेक्टर, भाजीपाला व अन्य पिकांचे २ हजार ३४२ हेक्टर, मिरचीचे १७२ हेक्टर नुकसान नोंदविण्यात आले आहे. विहिरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसण्यासाठी वीज, डिझेल, ठिबक सिंचन आणि मजुरीवरील खर्च वाढल्याने उत्पादन महागले आहे.
"नाशिक जिल्ह्यात दुष्काळाचा प्रभाव प्रामुख्याने कांदा व गहू लागवडीवर झाल्याचे दिसून येत आहे. या पिकांची लागवड सुमारे ५० टक्क्यांनी घटली असून, अन्य रब्बी पिकेही प्रभावित झाली आहेत. भाजीपाल्यावर आतापर्यंत मोठा प्रभाव दिसत नसला तरी डिसेंबरनंतर एल निनोचा वाढता प्रभाव आणि पाणीटंचाईमुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे."— रवींद्र माने, जिल्हा कृषी अधीक्षक
कादवाचे नदीपात्र कोरडे, रब्बी हंगाम धोक्यात
तालुक्यात यंदा पावसाने सुरुवातीला समाधानकारक हजेरी लावली. संपूर्ण पावसाळ्यात तीन ते चार दिवस जोरदार पावसामुळे तालुक्यातील धरणेही १०० टक्के भरली. मात्र पुढे पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले, तर काही ठिकाणी पाऊसच न झाल्याने नदी-नाल्यांचे पात्र सुमारे दोन महिने आधीच कोरडे झाले आहेत.
रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच कादवा नदीपात्रही कोरडे झाल्याने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे करंजवण धरणातून कादवा नदीत पाणी कधी सुटणार, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. चालू वर्षी परतीच्या पावसानेही दडी मारल्याने ऑक्टोबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठला आहे. दिंडोरी तालुक्यातील सर्व धरणांमध्ये आजमितीस समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे.
या धरणातील पाण्याचे जास्त दिवसांचे रोटेशन कमी दिवसांचे केल्यास पाणीटंचाई निर्माण होणार नाही, मात्र मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास एक ते दीड महिन्याचे रोटेशन सोडल्यामुळे अनेकवेळा उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. या रोटेशनमध्ये सुधारणा करून दर महिन्यास रोटेशन दिल्यास पाणीटंचाई निर्माण होणार नाही, अशी चर्चा शेतकरी वर्गामध्ये आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता करंजवण धरणातून कादवा नदीपात्रात काही तासांसाठी पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी गहू, हरभरा पेरणी तसेच उसाची लागवड खूप कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रब्बी हंगामात अतिशय विरळ प्रमाणात गहू, हरभरा पेरणी होणार आहे. यामुळे अन्नधान्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.