भात लावणी करण्यासाठी भात खाचरात मशागत करतांना मालगव्हाण येथील मनोहर चव्हाण हे शेतकरी.  (छाया : प्रशांत हिरे)
नाशिक

Nashik Drought|काय रं दाजी.. पेरलस का नाय.. ? पाणीज नाय त...

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील शेतकरी संकटात

पुढारी वृत्तसेवा

सुरगाणा :

काय रं दाजी.. पेरलस का नाय.. ?

पाणीज नाय वरसं त कशांकज पेराये..

आमच्या कड त पियाल पाणी नाय...

पाणदेवा कड जाये लागील...

आदिवासी शेतकरी बांधवांच्या तोंडून एकमेकास पावसाची विचारपूस करण्यासाठी वापरले जाणारे हे कोकणी, डांगी भाषेतील संभाषण सध्या सर्वत्र बाजारात, चौफुलीवर, बसमध्ये, काही कार्यक्रमात गेलं की तिथं कानी पडत आहे.

  • सुरगाणा तालुक्यात जुन महिना उलटत आला तरी चांगला पाऊस नाही.

  • शेतीची कामे खोळंबली असून पेरण्या झालेल्या नाहीत.

  • विहरींनी तळ घाटल्याने शेतीबरोबरच प्यायला पाणी नाही.

  • शेतकरी आकाशाकडे टक लावून वरुणराजाची वाट पाहत आहे.

सुरगाणा तालुक्यात एकेकाळी सात जूनला मोसमी पावसाची हजेरी लागत असे. त्यानुसार पाऊस आज- उद्या येणार या आशेने काही शेतक-यांनी धुळ पेरणी करुन पंधरा ते वीस दिवस झाले आहेत. उगवण क्षमते एवढा पुरेसा पाऊस न झाल्याने धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. काहींच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. अजूनही भात पिकाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. भाताची रोपे टाकण्यासाठी झाडाच्या फांद्या, पालापाचोळा, शेण (गवर) जाळून राब तयार केला जातो. या मध्ये धानाचे बियाणे पेरले जाते. त्यामुळे रोपे चांगले जोमदार वाढ होते. राखेतून रोप सहजपणे काढता येते खणता येते. पावसाने जोरदार हजेरी न लावल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

पावसाच्या माहेरघरीच दुष्काळाचा वणवा

नदी, नाले, ओहळ, झरे, तलाव अजूनही कोरडे ठाक आहेत. पावसाच्या माहेरघरी दुष्काळाचा वणवा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पन्नास पेक्षा जास्त गावांना विहरींनी महिन्या पुर्वीच तळ गाठल्याने अजूनही पिण्याचे पाण्याची तीव्र टंचाईस सामोरे जावे लागते आहे. चाळीस पेक्षा जास्त गावांना टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे.

भात उत्पादक शेतकरी संकटात

पेरणी करीता जोरदार पावसाची प्रतिक्षा भात उत्पादक शेतकऱ्यांना आहे. तालुक्यात २१,८४४ खातेधारक शेतकरी आहेत. वनपट्टे धारकांचा समावेश केल्यास चाळीस हजारापेक्षा जास्त धान उत्पादक शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी सरासरी पाच हजारापेक्षा जास्त रक्कमेचे धान बियाणे खरेदी करत असतो. त्यामुळे अंदाजे वीस कोटी पेक्षा जास्त उलाढाल बियाणे खरेदी करण्यासाठी होत असते. धानाचे अधिक उत्पादन क्षमतेत वाढ व्हावी यासाठी आज प्रत्येक शेतकरी हायब्रीड बियाणे खरेदी करत आहेत. सरासरी प्रति किलो धान बियाणे तीनशे ते साडेतीनशे रुपये खर्च करून खरेदी केले जाते. पारंपरिक वाण शेतकरी वापरत नाहीत. उत्पादन कमी होत असल्याने खर्च व उत्पादन याचा ताळमेळ बसत नाही. पारंपरिक धान कोळपी, गरी कोळपी, बंगाळ, कोलम, खडशी, फुट्या, माळ कोलम, चिमणशाळ या जाती आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भाताची रोपे अजून टाकलेली नाहीत. पेरणी नंतर वीस ते पंचवीस दिवसांत रोपे लावणी करण्यास तयार होतात. पाऊस आजच्या घडीला वेळेवर सुरु झाला तर पुढील जुलै महिन्यात वीस ते पंचवीस तारखे पासून भात लावणी सुरु होऊ शकते. भात पीक येण्यास नव्वद ते एकशे तीस दिवसांचा कालावधी लागतो. गता वर्षी सप्टेंबर महिन्या पासूनच पावसाने दडी मारल्याने भात पीक धोक्यात आले होते. भात उत्पादनात घट झाली होती. अजून तरी तालुक्यात पंचवीस ते तीस टक्के धुळ पेरणी झाली आहे. शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. हवामानाचा अंदाज तरी खरा ठरत नाही.

बियाणे उत्पादन प्रशिक्षणाची गरज

महागडे बियाणे पेरणी केल्यास बियाणे वाया गेले तर नव्याने पेरणी करावी लागेल. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. आकाशाकडे टक लावून बसले आहेत. पावसाच्या माहेर घरी पाऊस रुसला अशी अवस्था धान उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. कृषी विभागाने भाताचे बियाणे कसे धरावे, उत्पन्न, तयार करावे या विषयाचे प्रशिक्षणाची शेतकऱ्यांना खरी गरज आहे. याबाबत शासन स्तरावरुन काही हालचाली अद्याप तरी दिसून येत नाही. भात बियाणे उत्पादक कंपन्या कोट्यवधी रुपये कमवता त. प्रति किलो साडेतीनशे रुपये बियाणे करीता खर्च येतो. भात विक्री केल्यास बारा ते पंधरा रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नाही. यासाठी बियाणे उत्पादन कसे करावे याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT