नाशिक : यंदा नाशिककरांनी मोठ्या धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली. दिवाळीत कचऱ्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून आले. दिवाळीच्या गेल्या सहा दिवसात शहरातून तब्बल ५५२९ मे.टन कचरा घंटागाड्यांद्वारे संकलित करून खतप्रकल्पावर वाहून नेण्यात आला. नियमित अंदाजे ७५० टन कचरा शहरातून संकलित केला जातो. यंदा दिवसाला साधारणपणे दीडशे मे. टन कचऱ्याची भर पडली. वाढीव कचरा संकलनासाठी अतिरीक्त घंटागाड्याची व्यवस्था घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आली होती.
दिवाळीनिमित्त घरांसह दुकानांची, तसेच विविध शासकीय वा खासगी आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर साफसफाई मोहीम हाती घेतली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असतो. हा अतिरिक्त कचरा संकलित करण्यासाठी २४ घंटागाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या मनपाने सुरू केल्या असून, सहा विभागांसाठी ३६ ट्रॅक्टर अतिरिक्त उपलब्ध करून दिले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून शहरातून दररोज सुमारे ७५० टन इतका कचरा संकलित केला जातो. मात्र दिवाळीमुळे कचऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. घराघरातील अडगळींमधील खराब व भंगार वस्तु, कपडे, मिठाईचे बॉक्स, फटाक्यांचा कचरा तसेच विविध भेट वस्तुंचे वेस्टन यामुळे कचऱ्यात वाढ झाली असून, दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्यापेक्षा सरासरी दीडशे टन कचरा वाढल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक अजित निकत यांनी सांगितले.
दररोज संकलित झालेला कचरा (टनामध्ये)
दि. १८ ऑक्टोबर - ९५०.७८५ टन
दि. १९ ऑक्टोबर - ९३१.७३
दि. २० ऑक्टोबर - ९६७.०५
दि. २१ ऑक्टोबर - ८६९.९०५
दि. २२ ऑक्टोबर - ८९८.१९
दि. २३ ऑक्टोबर ९१२.२६
नियमित दररोज संकलित होणारा कचरा ७५० टन
दिवाळीमुळे अंदाजे १५० टन कचऱ्याची वाढ
दिवाळीमुळे सहा ते सात दिवसांच्या कालावधीत दीडशे टन कचऱ्याची दररोज वाढ झाली. सणाच्या कालावधी व्यतिरिक्त दररोज साडेसातशे टन कचरा संकलित केला जातो.अजित निकत, संचालक, तथा उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन