Nashik Vibhagiya Sandarbh Seva Rugnalaya : संदर्भ रुग्णालयात हृदयरोग शस्त्रक्रिया सहा महिन्यांपासून बंद Pudhari News Network
नाशिक

Nashik Vibhagiya Sandarbh Seva Rugnalaya : संदर्भ रुग्णालयात हृदयरोग शस्त्रक्रिया सहा महिन्यांपासून बंद

जीवाशी खेळ : हजारो गोरगरीब, गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • रुग्णालयातील हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग (ओटी) गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णतः बंद

  • शस्त्रक्रिया विभागाचा मंजूर निधी नेमका जातो कुठे?

  • अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयांचा महागडा पर्याय स्वीकारावा लागतोय

नाशिक : निखिल रोकडे

संदर्भ रुग्णालयातील हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग (ओटी) गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णतः बंद असून, यामुळे शेकडो गरजू रुग्णांना उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे. गोरगरीब, वंचित घटकातील रुग्णांना शासकीय योजनांतर्गत दर्जेदार आणि मोफत उपचार मिळावेत, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या संदर्भ रुग्णालयाचा कारभारावरच सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सदर प्रकार म्हणजे थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्यासारखा असल्याने नागरिकांकधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

हृदयविकार हा तातडीचा आणि प्राणघातक आजार असताना, संदर्भ रुग्णालयात शस्त्रक्रिया सुविधा सहा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयांचा महागडा पर्याय स्वीकारावा लागत आहे. अनेक गोरगरीब रुग्णांना हा खर्च परवडणारा नसल्याने उपचारच मिळत नसल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेऊन उपचार मिळावेत, हा मूळ उद्देशच त्यामुळे निष्प्रभ ठरत आहे.

Nashik Latest News

संदर्भ रुग्णालयात कॅन्सर, हृदयरोग आणि किडनी या अत्यंत गंभीर आजारांवर उपचार केले जातात. देशात सर्वाधिक मृत्यू या तीन आजारांमुळे होत असताना, अशा रुग्णालयाकडून अपेक्षित असलेली तत्परता आणि संवेदनशीलता मात्र पूर्णतः अभावाने दिसून येत आहे. गंभीर रुग्णांच्या बाबतीत वेळेवर उपचार न मिळाल्यास त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात, याची जाणीव प्रशासनाला नसल्याचे चित्र आहे.

सोयीसाठी उभारलेले संदर्भ रुग्णालय आज गैरसोयीचे प्रतीक बनत चालले असून, याला रुग्णालय प्रशासनाची उदासीनता आणि निष्क्रियता कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. शासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग सुरू करावा, निधीच्या वापराची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व रुग्ण संघटनांकडून केली जात आहे. अन्यथा हा विषय आणखी तीव्र आंदोलनाचे रूप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निधी बद्दल संशय

सर्वात गंभीर बाब म्हणजे इतक्या दीर्घ कालावधीतही रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल झालेली दिसून येत नाही. हृदयरोग शस्त्रक्रिया विभागासाठी शासनाकडून मंजूर झालेला निधी नेमका कुठे खर्च झाला, तो प्रत्यक्ष उपचार सुविधांसाठी वापरला गेला की, नाही याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. निधी असूनही सेवा सुरू नसतील, तर जबाबदारी कोणाची, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT