nashik 
नाशिक

Nashik News | ग्राहकांची फसवणूक; 523 व्यावसायिकांवर गुन्हे

Nashik News | विभागात हजारो व्यापारी वजन काटेधारकांकडून मापात पाप

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : प्रफुल्ल पवार

सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी मोठ्या शासनस्तरावर प्रमाणात जनजागृती केली जात असली, तरी ग्राहकांची लूट खुलेआम सुरूच असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात नाशिक विभागात लाखाहून अधिक वजनकाट्यांची पडताळणी करण्यात आली. त्यात दोषी

आढळलेल्या तब्बल ५२३ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक २०२ गुन्हे अहिल्यानगर जिल्ह्यात, तर नाशिक ग्रामीणमध्ये ५२ गुन्हे दाखल झाले आहेत. दरवर्षी वजनकाट्यांची तपासणी व मुद्रांकन करणे कायद्यानुसार बंधनकारक असूनही बहुतांश व्यापारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसले.

राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि वैध मापनशास्त्र यंत्रणेमार्फत १ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या पडताळणीत अनेक व्यावसायिकांचे वजनकाटे दोषी आढळले.

इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांचे मुद्रांकन व पडताळणी न करता, व्यवसाय केल्याचे तसेच काही ठिकाणी ग्राहकांची लूट केल्याचे निदर्शनास आले. दोषी आढळलेल्या ५२३ व्यापाऱ्यांकडून ३१ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सहनियंत्रक वैध मापनशास्त्र विभाग अंतर्गत पाच जिल्हा उपनियंत्रक कार्यालये कार्यरत आहेत. २०२५-२६ (जानेवारी अखेर) पर्यंत ५२३ खटले प्रशमन करीत ३१ लाख ८८ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

या आकडेवारीवरून ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने अजूनही मोठ्या प्रमाणात सुधारणा आवश्यक असल्याचे स्पष्ट होते. नियमांचे पालन करीत वजनकाट्यांची वेळेवर पडताळणी न झाल्यास ग्राहकांचे आर्थिक शोषण रोखणे अशक्य असल्याने संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षता घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

वजनकाट्यांचा वापर व महत्त्व

सकाळच्या दुधापासून ते सायंकाळच्या भाजीपाल्यापर्यंत ग्राहक जेव्हा खरेदीसाठी जातात, तेव्हा योग्य वजन व माप अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, नाशिक विभागातील हजारो व्यापाऱ्यांकडून नियमबाह्यरीत्या वजनकाट्यांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांची सर्रास फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

सध्या ग्राहकांमध्ये अपेक्षित जागृती नाही. नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. आम्ही स्वतः अनेक स्टिंग ऑपरेशन्स केले असून, त्यात अनेकांना दंड ठोठावला आहे. मात्र, ग्राहकांनीही स्वतः लक्ष घालून तक्रारी केल्यास नक्कीच लूट थांबेल.
-आशा पाटील, ग्राहक
संरक्षण मंच ग्राहकांनी वस्तू घेताना वजनकाट्याची पडताळणी प्रमाणपत्राबाबत चौकशी करावी. चुकीचे आढळल्यास आमच्या विभागाशी संपर्क करावा. दुकानदारांनीही ग्राहकांची लूट होणार नाही याची दक्षता घ्यावी. आम्ही नियमित तपासणी करत अवैध व्यापार करणाऱ्यांवर अधिकाधिक गुन्हे दाखल करू.
नरेंद्रसिंह मोहनसिंह, सहनिबंधक, वैध मापनशास्त्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT