नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी सिन्नर तालुक्यातील नागरिकांना आता जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. राज्य शासनाने नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, पहूर आणि चाळीसगाव, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाला अंतिम स्वरूप दिले असून, त्यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी (दि. २३) जारी करण्यात आला. राज्यात एकूण नऊ नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू होणार आहेत.
महसूल विभागाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण करून नागरिकांना स्थानिक पातळीवर सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील नागरिकांना जमिनीशी संबंधित विविध महसुली कामांसाठी तहसील कार्यालयात जावे लागते. अपर तहसीलदार कार्यालय सुरू झाल्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना जमीनविषयक आणि अन्य महसुली कामे स्थानिक स्तरावर करून घेता येणार आहेत. त्यामुळे वेळ, प्रवास आणि आर्थिक खर्चाची बचत होण्याची अपेक्षा आहे.
या नवीन कार्यालयांकडे महसुली अधिकार आणि कामकाज सोपविण्यात येणार असले, तरी निवडणूकविषयक कामे, संजय गांधी निराधार योजना तसेच अन्य बिगरमहसुली कामे पूर्वीप्रमाणेच मूळ तहसीलदार कार्यालयामार्फत केली जाणार आहेत. अशा स्वरूपाचे अर्ज किंवा निवेदने अपर तहसीलदार कार्यालयात प्राप्त झाल्यास, ती पुढील कार्यवाहीसाठी मूळ तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. राज्यातील नागपूर आणि नाशिक या दोन महसूल विभागांत ही नऊ कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.
नागपूर विभागात सावनेर तालुक्यातील चिचोली (खापरखेडा) आणि गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यातील आष्टी येथे कार्यालये होणार आहेत. नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, पहूर आणि चाळीसगाव, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू केली जाणार आहेत.
नशिक विभागातील नवीन कार्यालये
नाशिक : सिन्नर
जळगाव : जळगाव शहर, पहूर, चाळीसगाव
नंदुरबार : नंदुरबार, शहादा
धुळे : शिरपूर शहर