नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रात उत्कृष्ट, नावीन्यपूर्ण व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला व कृषी क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांमध्ये २०२३ आणि २०२४ या दोन्ही वर्षांत नाशिक जिल्ह्याने सर्वाधिक पुरस्कार पटकावित विशेष मान मिळविला.
या सर्व पुरस्कार विजेत्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा व कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव बुधवारी (दि. १) कृषी दिनानिमित्त मुंबईत राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.
कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शेतकरी, महिला व संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी शासन हे पुरस्कार प्रदान करते. यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न (तीन लाख), वसंतराव नाईक कृषिभूषण (दोन लाख), जिजामाता कृषी भूषण (दोन लाख), सेंद्रिय शेती पुरस्कार (दोन लाख), युवा शेतकरी पुरस्कार (१.२० लाख) आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (४४ हजार) यांसह विविध पुरस्कारांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आणि कृषी क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सलग दोन वर्षे राज्यातील सर्वाधिक कृषी पुरस्कार मिळवून जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राची गुणवत्ता, नावीन्यपूर्णता आणि प्रगतशीलतेची ओळख अधिक दृढ केली आहे. या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.- रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी