नाशिक : प्रफुल्ल पवार
जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर सरकारने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिलेले असून, आतापर्यंत १.९२ लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीची मर्यादा दोनवरून तीन हेक्टरपर्यंत वाढविण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
अतिवृष्टीमुळे नांदगाव, मालेगाव, येवला, पेठ, सुरगाणा आणि सिन्नर तालुक्यात मोठे नुकसान झाले. याबाबत जिल्हाधिकरी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला दिले होते.
जिल्ह्यात प्राथमिक अहवालानुसार २ लाख २२ हजार ६५४ शेतकरी बाधित झाले असून, २ लाख ३४ हजार २७२.६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पंचनाम्यांचा वेग वाढला असला तरी अजून ४१,९०८ हेक्टर क्षेत्र प्रलंबित आहे. आतापर्यंत ८२.११ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, त्यात १ लाख ९२ हजार ३२३.६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. जिल्ह्यातील १,४९४ गावांपैकी १,३०६ गावांतील पंचनामे पूर्ण झाले असून, १८३ गावांतील पंचनामे प्रलंबित आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून मात्र मंगळवारपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
अतिवृष्टीतील बाधित स्थिती
गावे.....१,४९४
शेतकरी....२,२२,६५४
क्षेत्र.....(हेक्टर) ..२,३४,२७२.६
--------
पूर्ण झालेले पंचनामे
गावे... १,३०६
शेतकरी... १,९२,२२३
टक्केवारीनुसार ........ ६२.११
-------
प्रलंबित पंचनामे
गावे----- १८३
प्रलंबित क्षेत्र (हे.) ..... ४१,९०८.४६