सोलापूर : महेश पांढरे
अवेळी आणि अतिपावसामुळे सोलापूर जिल्ह्यात नुकसान झालेल्या 89.4 टक्के शेती क्षेत्राचे पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आजअखेर सोलापूर जिल्ह्यातील 1 लाख 32 हजार 877 शेतकर्यांच्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित आणखी काही शेतकरी शिल्लक राहिले असून, त्यांच्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 1,145 गावांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये जिरायत 97 हजार 522 हेक्टर, बागायत37 हजार 482 हेक्टर, बहुवार्षिक आणि फळबांगामध्ये 13 हजार 642 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. अनेक ठिकाणी शेतकर्यांची वार्षिक पुंजीच वाया गेल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्यांना आर्थिक दिलासा मिळणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने या पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकाचे तत्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल द्यावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यावर प्रशासनाकडून तलाटी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांच्या मदतीने पंचनामे पूर्ण केले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 32 हजार 877 शेतकर्यांच्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर आणखी 15 हजार 769 शेतकर्यांचे पंचनामे बाकी आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत हे पंचनामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोणताच शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आली असून सर्व शेतकर्यांच्या शेती पिकाचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी कामात कोणीही कुचराई करु नये. तसेच शासकीय कर्मचारी यामध्ये हलगर्जीपणा करित असतील तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आपल्या शेती पिकाचे पंचनामे करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय पंचनामे पुढीलप्रमाणे-
उत्तर सोलापूर 10306, दक्षिण सोलापूर 11178, बार्शी 29189, अक्कलकोट 29189, मोहोळ 20563, माढा 10087, करमाळा 63791, पंढरपूर 16100, सांगोला 10087, माळशिरस 25917, मंगळवेढा 295285 असे एकूण सरासरी 132877 पंचनामे पूर्ण झाले आहेत.