Earthquake  pudhari photo
नाशिक

Nashik Earthquake | रात्री 10 वाजता जमिनीतून मोठा आवाज अन् थरकाप; नाशिक जिल्ह्यात एकाच रात्री भूकंपाचे 4 धक्के

Nashik Earthquake | 4.3 रिश्टर स्केल भूकंंपानंतर जिल्ह्यात वाढली सतर्कता

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण भागात जुलैमध्ये सलग पाच दिवस भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. त्यानंतर दि. ५, ६ व ८ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल ४.३ एवढी नोंदविण्यात आली. रात्री उशिरा तीन धक्के अजून जाणवले.

तुलनेत यावेळी भूकंपाची तीव्रता आणि विस्तार वाढला असून, जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये हे धक्के जाणवले. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून होणारा भूकंप 'अर्थक्वेक स्वार्म' प्रकारातील म्हणजे समूह भूकंप असून, नागरिकांनी घाबरून न जाता, सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, जलसंपदा विभागानेही खबरदारी घेत धरणांचा आढावा घेतला.


शनिवारी (दि. ८) रात्री १० च्या सुमारास नाशिकसह दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड, बागलाण, चांदवड, देवळा आणि सिन्नर या तालुक्यांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भूकंप मालिकेने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दि. २९ जुलैपासून जिल्ह्यात २० धक्के नोंदविण्यात आले.

शनिवारी रात्री जाणवलेला ४.३ रिश्टर स्केलचा धक्का या मालिकेतील सर्वाधिक तीव्र ठरला. यामुळे नाशिक शहरासह दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा आणि चांदवड परिसर हादरला. पेठ तालुक्यातील काही गावांत घरासह मंदिराच्या भिंतींना तडे गेले. शाळेच्या भिंतींची पडझड झाली. भूकंपाची खोली पाच किलोमीटर असून, केंद्रबिंदू २०.४२४ अंश उत्तर अक्षांश आणि ७३.६८२ अंश पूर्व रेखांशावर, सुरगाणा तालुक्याच्या आसपास असल्याचे स्पष्ट झाले आहे.


त्याचप्रमाणे शहरात उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना भूकंपाचे हादरे प्रकर्षाने जाणवले. चांदवड आणि देवळा परिसरात धक्का तुलनेने सौम्य होता. पेठ, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचे हादरे जाणवले. पेठमधील पहुचीबारी जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला भगदाड पडले. जुनोठी येथे मंदिराची भिंत कोसळली. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून उपलब्ध माहितीच्या आधारे परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अत्याधुनिक भूकंपमापन यंत्रणेमुळे आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

६ ऑगस्टला १२ तासांत सहा धक्के

जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवण्यास दि. २९ जुलैपासून सुरुवात झाली. त्यानंतर सुरगाणा, दिंडोरी आणि लगतच्या परिसरात सातत्याने सौम्य भूकंप नोंदविले गेले. ६ ऑगस्टला अवघ्या १२ तासांमध्ये सहा भूकंपाचे धक्के नोंदविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील भूकंपाच्या हालचालींकडे प्रशासन आणि राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राचे विशेष लक्ष आहे.

सुरगाण्यात सिस्मोग्राफ कार्यान्वित

भूकंपाच्या हालचालींचा अचूक निरीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सुरगाणा तहसील कार्यालयात अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ कार्यान्वित केला आहे. या यंत्रणेद्वारे परिसरातील भूकंपीय हालचालींची माहिती रिअल-टाईम पद्धतीने थेट नवी दिल्लीतील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रात पाठविली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील भूकंपाच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करणे शक्य होणार आहे.

बेसॉल्ट खडकांच्या हालचालींमुळे कंपन

गुजरात सीमेवरील या भागात बेसॉल्ट खडकांचे थर एकमेकांवर घासल्यामुळे भूकंपीय हालचाली निर्माण होत असल्याचा प्राथमिक अंदाज राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने व्यक्त केला आहे. दि. १७ जुलै रोजी नाशिकमध्ये २४ तासांत १६४ मिमी मुसळधार पाऊस झाला होता. पावसाचे पाणी जमिनीतील खोलवर गेल्यामुळे भूगर्भात ताण निर्माण झाला. त्यातून या हालचाली जाणवत असाव्यात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दगड-मातीच्या घरांना भूकंपरोधी बनविण्याचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील काही भागांत शनिवारी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी आतापर्यंत झालेल्या भूकंपांच्या तुलनेत यावेळी सर्वाधिक तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. त्यामुळे कच्च्या घरांना तसेच दगड-मातीच्या घरांना अधिक धोका निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी नोंदविण्यात आली. मेरी येथून प्राप्त माहितीनुसार तीव्रता ४.१ इतकी तीव्रता नोंदविली गेली.

मात्र, या दोन्ही परिस्थितींत या वर्षातील हा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप असल्याचे स्पष्ट झाले.
अशा भूकंपामुळे कच्च्या घरांना विशेषतः दगड-मातीच्या घरांना अधिक धोका असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. विशेषतः कच्चे बांधकाम दगड-मातीचे बांधकाम असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले.

"रात्री १० च्या सुमारास आम्ही कुटुंबातील सर्व जण जेवण करत असताना जमिनीतून गडगडाट ऐकू आला. वरील पत्र थरथरले. जेवणाची ताटे तडतड उडत होती. या प्रकारामुळे आम्ही घाबरून बाहेर पडलो."
— नरेंद्र जाधव, बाभळे, ता. सुरगाणा
"मी जेवण करून घरात बसलेलो असताना धक्का जाणवला. हा धक्का मोठा असल्यामुळे सर्वच ग्रामस्थ चौकामध्ये गोळा झाले होते. थोड्या वेळातच प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू आमचेच गाव असल्याचे समजताच गावात भीती पसरली. असेच धक्के रात्री तीन वेळेस बसले."
— भावेश वाघमारे, मनखेड, ता. दिंडोरी

रात्री उशिरा तीन धक्के

सुरगाणा तहसील कार्यालयात चार दिवसांपूर्वीच बसवण्यात आलेल्या सिस्मोमीटरमध्ये शनिवारी भूकंपाची नोंद झाली. १० वाजून ९ मिनिटांनी बसलेल्या भूकंपांतर अजून तीन धक्के बसल्याची माहिती सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली.

असे बसले भूकंपाचे धक्के

  • शनिवारी रात्री १०.०९: ४.३ रिश्टर स्केल

  • रविवारी रात्री ०१.३४: ३.९ रिश्टर स्केल

  • रविवारी रात्री ०१.४३: २.९ रिश्टर स्केल

  • रविवारी पहाटे ०५.३३: ३.३ रिश्टर स्केल"जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाची नोंद झाली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रशासनाला सहकार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तहसील, पोलिस पाटील, तलाठी किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा."— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

"जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाची नोंद झाली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रशासनाला सहकार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तहसील, पोलिस पाटील, तलाठी किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा."
— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT